एसटीला सहा महिन्यांत साडेसहा कोटींचा तोटा
By admin | Published: November 8, 2016 02:17 AM2016-11-08T02:17:45+5:302016-11-08T02:17:45+5:30
जिल्ह्यातील मुरबाड, शहापूर आणि वाडा या तालुक्यांमध्ये जीप व अन्य वाहनांद्वारे अवैधरित्या प्रवासी वाहतूक मोठ्याप्रमाणात सुरू असल्याने राज्य परिवहन महामंडळाच्या
ठाणे : जिल्ह्यातील मुरबाड, शहापूर आणि वाडा या तालुक्यांमध्ये जीप व अन्य वाहनांद्वारे अवैधरित्या प्रवासी वाहतूक मोठ्याप्रमाणात सुरू असल्याने राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी)ला ठाणे विभागात मागील सहा महिन्यांमध्ये सर्वाधिक सहा कोटी ५३ लाख ६७ हजार रूपयांचा तोटा झाल्याचे एसटीचे ठाणे विभाग नियंत्रक अविनाश पाटील यांनी सांगितले.
या अवैध प्रवासी वाहतुकीमुळे मुरबाड, शहापूर, वाडा येथील तिन्ही बसडेपो तोट्यात आहेत. मनमानी व बिनधास्त सुरू असलेली अवैध प्रवासी वाहतूक रोखण्यास आरटीओ व स्थानिक पोलीस यंत्रणा कमी पडल्याचे उघड झाले आहे. याचा फटका ग्रामीण भागात धावणाऱ्या एसटी बसेसला बसला असून त्या सध्या तोट्यात आहेत. या तिन्ही बसडेपोच्या परिसरात प्रत्येकी सुमारे ३०० खाजगी जीप, रिक्षा टेम्पोमधून प्रवासी वाहतूक करीत आहेत. रोज प्रत्येक तालुका बस डेपोच्या परिसरातून सुमारे दहा ते १५ हजार प्रवाशांची अवैधरित्या वाहतूक होत असल्याचा अंदाज व्यक्त करून त्यांचा आर्थिक फटका एसटीला बसल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या या सहा कोटी ५३ लाख रूपये तोट्यात शहापूर बसडेपोचे दोन कोटी ७६ लाख रुपये, मुरबाड डेपोचे एक कोटी ९३ लाख ६७ हजार आणि वाडा बस डेपोचे एक कोटी ८४ लाख रुपये यांचा समावेश आहे. ऐन दिवाळीत तर खाजगी ट्रॅव्हल्सच्या नव्या कोऱ्या ५०० बसेस विनापरवाना रस्त्यावर धावल्याचा अंदाज एसटीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. सुट्टीच्या कालावधीत देखील खासगी बसेसमुळे एसटीला दिवसाकाठी सुमारे ५० हजारांचा फटका बसत आहे. वंदना टॉकीज, जांभळी नाका, रबाळे, खोपट तसेच मुलुंड चेकनाका येथून खासगी ट्रॅव्हल्सच्या बसेस बिनधास्त प्रवासी घेतात व त्याचा फटका ठाण्यातील एसटीला बसत असल्याचे निदर्शनास आले आहे. (प्रतिनिधी)