ठाण्यातील कोरोना सेंटरमध्ये दोन दिवस पुरेल एवढाच रेमडेसीवीरचा साठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 05:19 PM2021-04-15T17:19:20+5:302021-04-15T17:19:41+5:30
खाजगी रुग्णालयात पुरवठा अद्यापही उपलब्ध नाही. मागील काही दिवसापासून ठाण्यासह राज्याच्या विविध भागात रेमडेसिवरच्या इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे डॉक्टरांकडून रुग्णांच्या नातेवाईकांना हे इंजेक्शन आणण्यासाठी सांगितले जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : मागील काही दिवसापासून ठाण्यासह जिल्ह्यातही रेमडेसिवरचा तुटवडा जाणवत आहे. ठाणे महापालिकेच्या कोवीड सेंटरमध्ये केवळ ८०० च्या आसपास रेमडेसिवचा साठा उपलब्ध असून तो केवळ एक ते दोन दिवस पुरेल एवढाच असल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे खाजगी रुग्णालयांना अद्यापही रेमडेसिवरचा पुरवठाच होऊ शकला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची हे इंजेक्शन मिळावे, यासाठी धावपळ आजही सुरुच असल्याचे दिसत आहे.
मागील काही दिवसापासून ठाण्यासह राज्याच्या विविध भागात रेमडेसिवरच्या इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे डॉक्टरांकडून रुग्णांच्या नातेवाईकांना हे इंजेक्शन आणण्यासाठी सांगितले जात आहे. त्यामुळे हे इंजेक्शन मिळविण्यासाठी नातेवाईकांची तारेवरची कसरत सुरु असल्याचे दिसत आहे. परंतु या इंजेक्शनचा काळा बाजार रोखण्यासाठी आता शासनाकडून मेडीकलमधील रेमडेसिवर विकले जाणार नसल्याचे सांगण्यात होते. परंतु त्यालाही चार ते पाच दिवस उलटून गेले तरी देखील खाजगी कोवीड रुग्णालयात देखील रेमडेसिवरचा साठा उपलब्ध होऊ शकला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आज चार दिवस उलटूनही खाजगी रुग्णालयाकडून रेमडेसिवरचे इंजेक्शन मिळावे यासाठी खाजगी रुग्णालयांनी महापालिकेकडे पत्रव्यहार केला आहे. एकीकडे खाजगी रुग्णालयांना ऑक्सीजनचा तुटवडा जाणवत असतांना आता रेमडेसिवरचा देखील साठा उपलब्ध होत नसल्याने रुग्णांवर उपचार कसे करावेत असा पेच डॉक्टरांपुढे निर्माण झाला आहे. दुसरीकडे रुग्णांना हे इंजेक्शन मिळावे यासाठी रुग्णांची धावपळ सुरु आहे. सोशल मिडियावर हे इंजेक्शन मिळावे म्हणून प्रयत्न केले जात आहेत. परंतु अद्यापही हा साठा उपलब्ध झालेला नाही.
दुसरीकडे ठाणो महापालिकेकडे आजच्या घडीला ८०० च्या आसपास रेमडेसिवरचा साठा असून तो पुढील एक ते दोन दिवस पुरेल एवढाच आहे. १८ एप्रिल र्पयत साठा मिळेल अशी आशा पालिकेला आहे. परंतु तो मिळाला नाही तर कठीण होऊन बसेल अशी भितीही पालिकेला वाटत आहे. त्यामुळेच खाजगी रुग्णालयांकडून मागणी होऊनही पालिका त्यांना रेमडेसिवरच पुरवू शकत नसल्याची माहिती समोर आली आहे.