शेअर रिक्षा डोंबिवलीत महागली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 12:29 AM2018-07-27T00:29:22+5:302018-07-27T00:29:47+5:30
२ ते १० रुपये वाढ; लवकरच अंमलबजावणी
डोंबिवली : शहरातील सर्वच मार्गांवरील शेअर रिक्षांचा प्रवास पुढील आठवड्यापासून किमान दोन रुपये ते कमाल १० रुपयांपर्यंत वाढणार आहे. जवळच्या अंतराचा प्रवास मात्र महागणार नाही. एकूणच या भाडेवाढीमुळे सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
सीएनजी रिक्षांसाठी आरटीओने २०१५ मध्ये मंजूर केलेले दरपत्रक सोमवारपासून ठिकठिकाणी प्रसिद्ध करावे, जेणे करून रिक्षाचालक व प्रवाशांमध्ये वाद होणार नाहीत, असे संघटना आणि आरटीओ अधिकाऱ्यांमध्ये ठरवण्यात आले. तसेच भाडेवाढीनंतर चालकाशेजारी चौथा प्रवासी न घेण्याचेही यावेळी सर्वानुमते ठरवण्यात आले.
पश्चिमेतील सुभाष रोडवरील रिक्षाचालकांनी प्रति प्रवासी दोन रुपयांची भाडेवाढ बेकायदा केली होती. या भाडेवाढीवरून रिक्षाचालक व प्रवाशांमध्ये संघर्ष सुरू होता. त्यापार्श्वभूमीवर कल्याणमधील आरटीओ अधिकाºयांनी गुरुवारी बैठक घेतली. यावेळी झालेल्या चर्चेनुसार चार वर्षांपूर्वीचे दरपत्रक आरटीओने रिक्षास्टॅण्डवर लावावे, चौथा प्रवासी घेऊ नये, असे निर्णय घेण्यात आले. ही भाडेवाढ प्रवासी स्वीकारतात का, हे बघावे लागणार आहे. प्रवाशांकडून नवीन दरानुसार भाडे मिळावे, यासाठी आरटीओ अधिकारी, वाहतूक नियंत्रण विभाग यांचे सहकार्य आवश्यक असल्याचे रिक्षा संघटनांचे मत आहे.
दरम्यान, पश्चिमेतील मार्गांवरील भाडेवाढीसंदर्भात आरटीओ अधिकारी तातडीने पाहणी दौरा करतील. यावेळी ते नागरिकांशीही चर्चा करतील. त्यानुसार, आवश्यक ते बदल केले जातील. त्यानंतरच योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांनी सांगितले. दरवाढीसंदर्भात आणि रिक्षाचालकांच्या अन्य मागण्यांसंदर्भात एमएमआरटीएकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याचेही ससाणे म्हणाले.
दरम्यान, ‘लोकमत’च्या ‘हॅलो ठाणे’मध्ये ‘रिक्षा प्रवास महागणार’ अशा आशयाचे वृत्त बुधवारी प्रसिद्ध झाले होते, ते खरे ठरल्याची चर्चा प्रवासी संघटनांमध्ये सुरू आहे.
लांबच्या प्रवासात भाडेवाढ
१.५ किमीसाठी १८ रुपये भाडे आकारण्यात येते. पुढे प्रत्येक किमीला ते ११ रुपयांनी वाढत जाते. त्यानुसार, जवळच्या अंतरासाठी सध्या जे भाडे आकारले जाते, ते तेवढेच असेल. परंतु, लांबच्या प्रवासामध्ये दोन ते १० रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते.