२० टन प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त, उल्हासनगरातील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2020 12:57 AM2020-03-05T00:57:47+5:302020-03-05T00:57:53+5:30
कारखान्यातील कामगार पळून गेले असून पुढील कारवाई सुरू आहे, अशी माहिती सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली.
उल्हासनगर : कॅम्प नं.-३ येथील पेहुमहल कम्पाउंड येथील प्लास्टिक पिशव्यांच्या कारखान्यावर महाराष्ट्र प्रदूषण मंडळ, महापालिकेने छापा घालून २० टन प्लास्टिकचा साठा जप्त केला. कारखान्यातील कामगार पळून गेले असून पुढील कारवाई सुरू आहे, अशी माहिती सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली.
उल्हासनगरमध्ये सर्रासपणे प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत असून पालिकेने बंदची कारवाई केलेले कारखाने सुरू झाल्याची शहरात कुजबूज आहे. महाराष्ट्र प्रदूषण मंडळ व महापालिका यांना पेहरूमल कम्पाउंडमध्ये प्लास्टिकच्या पिशव्यांचा कारखाना सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, बुधवारी सकाळी ११ वाजता कारखान्यावर छापा घातला असता गोण्यांत २० टन प्लास्टिक पिशव्यांचे घबाड सापडले.
छाप्यावेळी कामगारांनी पळ काढला असून कारखानामालकाचा शोध सुरू आहे. असे अनेक प्लास्टिक पिशव्यांचे कारखाने सुरू असल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे. पालिकेची नियमित कारवाई सुरू नसल्याने कारखाने सुरू असल्याची माहिती नागरिकांनी दिली.
शहरात कारखान्यांची संख्या मोठी असून जीन्स कारखान्यांपाठोपाठ प्लास्टिक पिशव्यांच्या बंदीमुळे प्लास्टिकच्या कारखान्यांना ग्रहण लागले. बंदीमुळे यातील अनेक कारखाने गुजरात व भिवंडी-कल्याण ग्रामीण परिसरात स्थलांतरित झाले. मात्र, काही कारखाने लपूनछपून अद्यापही सुरू असल्याचे आजच्या कारवाईवरून उघड झाले.