भिवंडीत कचऱ्यात आढळला शासकीय औषधांचा साठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 05:01 AM2021-02-23T05:01:04+5:302021-02-23T05:01:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क भिवंडी : भिवंडी तालुक्यातील वळ ग्रामपंचायत हद्दीतील मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनच्या शेजारील रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : भिवंडी तालुक्यातील वळ ग्रामपंचायत हद्दीतील मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनच्या शेजारील रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर औषधांचा साठा कचऱ्यात फेकून दिल्याची धक्कादायक बाब सोमवारी निदर्शनास आली आहे. याच ठिकाणी परदेशातील वापरलेले एन ९७ मास्क फेकल्याचे प्रकरण कोरोना काळात मागील वर्षी उघडकीस आले होते.
या सर्व औषध साठ्याची वापरण्याची मुदत अजून संपलेली नसून, यामध्ये हरियाणा सरकारसाठी बनविलेल्या औषधांचाही समावेश आहे. काही औषधांच्या गोळ्या या डॉक्टरांना देण्यासाठी बनविलेली सॅम्पल पाकिटे असून, तीही या कचऱ्यात फेकली आहेत. या गंभीर बाबीकडे पोलीस प्रशासनासह आरोग्य यंत्रणेचे कोणतेही लक्ष नसून, ही कचऱ्यात फेकलेली औषधे कोणी उचलून नेऊन त्याचा दुरुपयोग केल्यास त्यास जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित केला आहे. त्याचबरोबर ही औषधे नेमकी कोणी व का फेकली, याचा शोध घेणे गरजेचे आहे.
दरम्यान, या प्रकाराबाबत ठाणे जिल्हा परिषद आरोग्य समिती सभापती कुंदन पाटील म्हणाले की, सदर बाब गंभीर स्वरूपाची असून, याबाबत चौकशी होऊन सदरचा औषध साठा कचऱ्यात फेकणाऱ्यास शोधून काढून कारवाई केली पाहिजे.
..........