ठाण्यात रविवारपर्यंतच रेमडेसिविरचा साठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:39 AM2021-04-18T04:39:34+5:302021-04-18T04:39:34+5:30
ठाणे : राज्यात प्रचंड टंचाई निर्माण झाल्याने महत्त्वाच्या शहरांमध्ये नागरिकांची रेमडेसिविरचे इंजेक्शन मिळवण्यासाठी धडपड सुरू असून ठाणे महापालिकेने ...
ठाणे : राज्यात प्रचंड टंचाई निर्माण झाल्याने महत्त्वाच्या शहरांमध्ये नागरिकांची रेमडेसिविरचे इंजेक्शन मिळवण्यासाठी धडपड सुरू असून ठाणे महापालिकेने मात्र आहे त्या दरात इंजेक्शन खरेदी करण्याची तयारी दर्शवली आहे. कारण, ठाण्यात रेमडेसिविरचा साठा संपुष्टात आला असून दोन दिवसांत तो उपलब्ध झाला नाही, तर सोमवारी रुग्णांना इंजेक्शन देण्यासाठी एकही डोस उपलब्ध नसेल, अशी भीती प्रशासनाने व्यक्त केली आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात दररोज पंधराशे ते सतराशेच्या घरात रुग्ण सापडत असून यामुळे नागरिकांना बेडदेखील मिळेनासे झालेत. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंबाबतही चिंता व्यक्त होत असून यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. याशिवाय, सर्वात मोठे संकट निर्माण झाले आहे, ते रेमडेसिविरचे. त्यावर मोठ्या संख्येने नागरिक ठाणे महापालिकेच्या कोविड रुग्णालयांवर अवलंबून आहेत. खाजगी रुग्णालयांनी तर याबाबत हात वर केले असून नागरिकांनाच इंजेक्शन आणून देण्याची सक्ती केली जात आहे. त्यामुळे हे इंजेक्शन मिळविण्यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांची धडपड सुरू आहे. राजकीय मंडळींकडून प्रयत्न करून दोन ते तीन इंजेक्शन उपलब्ध होत आहेत. मात्र, सर्वच गरजवंतांना ती उपलब्ध होत नसल्याने रुग्णांचे नातेवाईकही हवालदिल झाले आहेत.
ठाणे महापालिकेकडील रेमडेसिविरचा साठा संपत आला असून अगदी काटकसर करून जेमतेम रविवारी संध्याकाळपर्यंत ते उपलब्ध होऊ शकते. मात्र, या दोन दिवसांत जर ते उपलब्ध झाले नाही, तर मात्र ठाण्यात गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
"दोन दिवसांचाच रेमडेसिविरचा साठा उपलब्ध असून राज्य शासनाकडून तो उपलब्ध व्हावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दोन दिवसांत तो मिळण्याची शक्यता आहे. राज्यातच टंचाई असल्याने गंभीर परिस्थिती असून आहे त्या दराने रेमडेसिविर खरेदीची तयारी ठाणे महापालिकेची आहे." - गणेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त, ठा.म.पा.