चोरीचे दागिने दोन वर्षांनी मिळाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 12:19 AM2021-02-07T00:19:08+5:302021-02-07T00:19:20+5:30
पावणेदहा लाखांचा ऐवज; देवयानी पंडित यांनी मानले पोलिसांचे आभार
टिटवाळा : पूर्वेतील एकवीरा निवास येथे राहणाऱ्या देवयानी पंडित यांना त्यांचे दोन वर्षांपूर्वी चोरीला गेलेले पावणेदहा लाख रुपयांचे दागिने अखेर परत मिळाले आहेत. ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या हस्ते गुरुवारी त्यांना दागिने परत मिळताच, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.
पंडित यांच्या घरी ५ मे ते १४ जून, २०१९ या दरम्यान चोरी झाली होती. त्यात चोरट्यांनी घरातील चांदी, तांबे व पितळेची भांडी, तसेच पंडित यांच्या आईचे ५० वर्षांपूर्वीचे सव्वातीन तोळे वजनाचे दागिने, असा एकूण १२ लाख ७० हजार रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला होता.
टिटवाळा येथील कल्याण तालुका पोलीस स्टेशनने २४ जुलै, २०१९ला दोन अल्पवयीन चोरट्यांना ताब्यात घेत, त्यांच्याकडून नऊ लाख ७५ हजार १९९ रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले. या चोरट्यांना नंतर भिवंडीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले. न्यायालयीन प्रक्रियेनंतर अखेर दोन वर्षांनी गुरुवारी देशमाने यांच्या हस्ते पंडित यांना ते दागिने परत करण्यात आले. दागिने परत मिळाल्याने पंडित यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. यावेळी त्यांनी पोलिसांचे आभार मानले.
दागिने परत मिळाल्याने देवयानी पंडित यांना झालेला आनंद हीच आमच्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामाची पोचपावती आहे.
- राजू वंजारी, पोलीस निरीक्षक, टिटवाळा