आधुनिक कचरापेटीच्या सहा सेन्सर चीप चोरीला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2018 06:36 AM2018-12-16T06:36:03+5:302018-12-16T06:36:29+5:30
महापालिकेकडून तक्रार नाही : स्टेशन परिसरातील प्रकार, ७२ ठिकाणी टेकबिन
ठाणे : ठाणे महापालिकेने शहराच्या विविध भागात अत्याधुनिक कचरापेटी अर्थात टेकबिन बसविल्या आहेत. यामध्ये ओला आणि सुका कचरा वेगळा टाकण्यासाठी दोन कप्पे आहेत. त्यात एका ठिकाणी आतील बाजूस एक सेन्सरही बसविण्यात आले आहेत. परंतु, मासुंदा आणि स्टेशन परिसरातील सहा टेकबिनच्या सेन्सर चीप चोरीला गेल्या आहेत. मात्र, या संदर्भात अद्याप पालिकेने पोलीस स्टेशनला तक्रार केलेली नाही.
शहरातील मोक्याच्या आणि गर्दीच्या ठिकाणी कचरा कुठेही कसाही टाकला जात होता. त्यामुळे या भागात फिरण्यासाठी येणाऱ्यांना शिस्त लागावी म्हणून ठाणे महापालिकेने विविध भागात ७२ टेकबिन बसविल्या आहेत. मागील एक महिन्यापासून त्या कार्यान्वित आहेत. यामध्ये कचरा टाकणाºयांसाठी पेटीएम मध्ये सवलत देण्यात येणार आहे. त्यामुळे अधिकाधिक ठाणेकरांनी याचा लाभ घ्यावा यासाठी पालिकेने जनजागृतीसुद्धा केलेली आहे.
या टेकबिनमध्ये ओला आणि सुका कचरा टाकण्यासाठी दोन कप्पे देण्यात आले आहेत. या कप्यातून कचरा टाकतांना आतमध्ये एक सेन्सर चीप बसविली आहे. तिला बारकोड असून तो मोबाइलद्वारे मॅच केल्यानंतर कचरा टाकणाºयांसाठी पेटीएममध्ये सवलत दिली जाणार आहे. ही योजना येत्या काही दिवसात सुरू होणार आहे. परंतु, त्या आधीच स्टेशन आणि मांसुदा परिसरात बसविलेल्या सहा टेकबिनच्या चीप चोरीला गेल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली. या एका सेन्सर चीपची किमंत अंदाजे पाच ते सहा हजारांच्या घरात असल्याचे बोलले जात अहे. या संदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकारी मनिषा प्रधान यांना छेडले असता त्यांनी याला दुजोरा दिला. परंतु,या संदर्भात अद्याप पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. चोरीला गेलेल्या चीपच्या ठिकाणी नवीन चीप बसविण्यात येणार आहेत. संबधींत खाजगी संस्थेच्या माध्यमातून हा खर्च केला जाणार आहे.
हे आहेत टेकबीनचे स्पॉट
च् पोखरण रोड -२०
च् उपवन -८
च्मासुंदा तलाव -२४,
च्सॅटिस - ५
च्नौपाडा, नितिन कंपनी, हरिनिवास - १०