ठाण्यात तीन घरे फोडून साडे सात लाखांचा ऐवज चोरीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 07:46 PM2018-02-17T19:46:56+5:302018-02-17T19:52:48+5:30
ठाणे: शहरातील कापूरबावडी आणि मुंब्रा या परिसरांत फोडण्यात आलेल्या तीन घरांतून चोरट्यांनी सुमारे साडेसात लाखांचा ऐवज लांबवला आहे. या तिन्ही घटना शुक्रवारी घडल्या असून त्या घटनांमध्ये सुमारे ३४ तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची माहिती पोलिसांनी दिली.
बाळकुम, शिवाजीनगर येथे राहणारे किरण कुंभार (३९) यांच्या घरातील किचनच्या दरवाजाची आतील कडी उघडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. तसेच कपाटातील आणि कुं भार यांच्या पॅण्टच्या खिशातील पाकिटातून असे चार लाख दोन हजारांचा ऐवज चोरीला गेला आहे. यामध्ये तीन लाखांचे दागिने आणि ५५ हजारांची रोकड असल्याचे तक्रारीत नमूद असून हा प्रकार १५ फेब्रुवारी रात्री १० ते १६ फेब्रुवारी ४.१० वा.च्या सुमारास घडल्याची माहिती कापूरबावडी पोलिसांनी दिली.
दुस-या घटनेत, बाळकुम पाडा-१ येथे राहणारे कमलेश ताहिलरमानी (४२) हे १६ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ ते १ वा.च्या दरम्यान बाहेर गेले होते. याचदरम्यान, चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील ७१ हजारांचे सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केल्याची माहिती कापूरबावडी पोलिसांनी दिली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एन.बी. गिरासे तपास करत आहेत.
तसेच तिस-या घटनेत मुंब्रा, कौसागावमधील सागर पाटील (२८) हे १६ फेब्रुवारीला काही कामानिमित्त बाहेर गेले होते. दरम्यान, त्यांच्या घराचे कुलूप उचक टून चोरट्यांनी घरातील सोनेचांदीच्या दागिन्यांसह ५५ हजारांची रोकड असा दोन लाख ५८ हजारांचा ऐवज लांबवला आहे. याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक व्ही.पी. करडे करत आहेत.