दागिन्यांऐवजी रुमालात बांधली खडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:41 AM2021-05-12T04:41:34+5:302021-05-12T04:41:34+5:30
मुंब्रा : पोलीस चौकशी सुरू असल्याची बतावणी करून एका व्यापाऱ्याकडील सव्वादोन लाख रुपये किमतीचे दागिने घेऊन त्याऐवजी रुमालात खडी ...
मुंब्रा : पोलीस चौकशी सुरू असल्याची बतावणी करून एका व्यापाऱ्याकडील सव्वादोन लाख रुपये किमतीचे दागिने घेऊन त्याऐवजी रुमालात खडी बांधून देऊन पोबारा केलेल्या चौघांविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाण्यातील कोलबाड भागातील रुणवालनगर येथील सिद्धिविनायक टाॅवरमध्ये राहत असलेले संतोष शेट्टी हे व्यापारी सोमवारी दुपारी रेतीबंदर परिसरातून मुंब्र्याच्या दिशेने चालले होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या चौघांनी पुढे पोलीस चौकशी सुरू आहे. त्यामुळे अंगावरील दागिने काढून रुमालात बांधून ठेवण्यास शेट्टी यांना सांगितले. त्यानुसार त्यांनी सहा तोळे वजनाची एक लाख ८० हजार रुपये किमतीची सोन्याची चेन आणि ४५ हजार रुपये किमतीच्या दोन अंगठ्या असे एकूण सव्वादोन लाख रुपये किमतीचे दागिने रुमालात बांधून ठेवण्यासाठी अंगावरून काढले. तेव्हा त्यांच्यापैकी दोघांनी रुमालात बांधून देण्याच्या बहाण्याने त्यांनी दागिने हातात घेतले आणि नजर चुकवून दागिन्यांऐवजी रुमालात खडी बांधून दिली. काही वेळाने रुमालात दागिन्यांऐवजी खडी बघून फसवणूक झाल्याचे शेट्टी यांच्या लक्षात आले, अशी माहिती तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक प्रदीप गायकवाड यांनी ‘लोकमत’ला दिली.