चेंदणी कोळीवाडा, राबोडी आणि हाजुरीचे बायोमेट्रीक सर्वेक्षण थांबवा, गावठाण कोळीवाड्यांनी धाडले थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 05:14 PM2019-01-01T17:14:42+5:302019-01-01T17:16:13+5:30
प्रशासन आणि गावठाण कोळीवाड्यातील संघर्ष अद्यापही संपुष्टात आलेला नाही. त्यामुळेच जो पर्यंत सीमांकन निश्चित होत नाही, तो पर्यंत बायोमेट्रीक सर्वेक्षण करण्यात येऊ नये अशी मागणी समितीच्या वतीने थेट मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.
ठाणे - क्लस्टर योजनेतून गावठाण आणि कोळीवाड्यांना वगळण्यात आले असले तरी पालिका प्रशासन आणि त्यांच्यातील संघर्ष अद्यापही संपुष्टात आलेला नाही. नव्या वर्षात हा संघर्ष आणखी पेटणार असल्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. गावठाण कोळीवाड्यातील रहिवासी आजही सिमांकनाच्या मुद्यावर ठाम असून त्यांनी याची मागणी लावून धरली आहे. दुसरीकडे महापालिकेने सुरु केलेल्या बायोमेट्रीक सर्वेक्षणालासुध्दा आक्षेप घेतला. या संदर्भात त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र व्यवहार करुन चेंदणी कोळीवाडा, राबोडी व हाजुरी येथील गावठाणांचे सर्वेक्षण करु नये अशी मागणी केली आहे.
काही दिवसांपूर्वी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी गावठाण आणि कोळीवाड्यांना या योजनेत सहभागी व्हायचे असेल तर ते होऊ शकतात, असे स्पष्ट करीत बायोमेट्रीक सर्वेक्षणाला सुरवात केली आहे. १ जानेवारी पासून आता हे सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. परंतु या सर्वेक्षणाच्या विरोधात पुन्हा गावठाण कोळीवाड्यातील रहिवाशांनी आवाज उठविला आहे. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी हाजुरी येथे या बाबत एक सभाही ठाणे शहर गावठाण कोळीवाडा पाडे संवर्धन समितीच्या वतीने लावण्यात आली होती.
महापालिका प्रशासन तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी हे जबरदस्तीने बायोमेट्रीक सर्वेक्षण करुन घेण्यासाठी हट्ट धरीत असल्याचा आरोप समितीच्या वतीने करण्यात आला आहे. त्यातही बायोमेट्रीक सर्वे केला नाही तर तुम्हांला घर मिळणार नाही, असा दबावही रहिवाशांवर टाकला जात आहे. परंतु ही पध्दतच मुळात चुकीची असून रहिवाशांना आधी विश्वासात घेणे गरजेचे असल्याचे मत समितीने व्यक्त केले आहे. आमचा या योजनेला विरोध नाही, परंतु ज्या पध्दतीने ही योजना राबविण्याची घाई केली जात आहे, जी पध्दत अवलंबीली जात आहे, ती चुकीची असल्याचे मतही समितीने व्यक्त केले.
त्यामुळे समितीने आता या जबरदस्तीच्या सर्वेक्षणाला विरोध दर्शविला आहे. चेंदणी कोळीवाडा, राबोडी आणि हाजुरी भागातील बायोमेट्रीक सर्वेक्षण थांबविण्यात यावे अशी मागणी समितीच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. या पत्रामध्ये अद्यापही मुंबई ठाण्यातील गावठाण कोळीवाड्यांचे सीमांकन निश्चित झालेले नाही. त्यामुळे हे सीमांकन जो पर्यंत पूर्ण होत नाही, तो पर्यंत बायोमेट्रीक सर्वेक्षण करण्यात येऊ नये अशी मागणी समितीच्या वतीने करण्यात आल्याची माहिती समितीचे सदस्य गिरीश साळगांवकर यांनी दिली आहे.