शेती विकून हळद समारंभ करणे थांबवा
By Admin | Published: June 2, 2017 05:23 AM2017-06-02T05:23:14+5:302017-06-02T05:23:14+5:30
शेती विकून गाडी, बंगले घ्यायचे आणि मोठ्या थाटामाटात हळद व लग्नसमारंभ करायचे, ही मानसिकता बदलण्याची नितांत गरज
लोकमत न्यूज नेटवर्क
बदलापूर : शेती विकून गाडी, बंगले घ्यायचे आणि मोठ्या थाटामाटात हळद व लग्नसमारंभ करायचे, ही मानसिकता बदलण्याची नितांत गरज आहे. आता हळद, साखरपुडा आणि लग्नसमारंभ पाहून वीट येतो, अशा शब्दांत आमदार किसन कथोरे यांनी शेतकऱ्यांना कानपिचक्या दिल्या.
शेती पिकत नाही, शेतमाल विकला जात नाही, ही नकारात्मकता मनातून काढून टाका. बदलापूरची लोकसंख्या प्रचंड वाढत आहे. या लोकसंख्येला अपुरा भाजीपाला उपलब्ध होत आहे. बदलापूर आणि आसपासच्या परिसरात जितकी शेती पिकवू, तितकी कमीच आहे. आपण शेती करा, आपल्याला काय कमी पडते, ते सांगा. शासनाच्या माध्यमातून ते उपलब्ध करून देण्याकरिता सर्वतोपरी सहकार्य करू, असे आश्वासनही कथोरे यांनी दिले.
‘शिवार संवाद’कार्यक्र माच्या माध्यमातून कथोरे यांनी शेतकऱ्यांकरिता असलेले शासनाचे उपक्रम, योजना यांची माहिती दिली. शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन त्यांच्याशी संवाद साधला. बेडशीळ येथील सदानंद सुरोशे यांच्या ‘उत्कर्ष कृषी पर्यटन केंद्रा’च्या शेतावर झालेल्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, आपल्या विभागात शेतकरी शेतीसाठी कर्जच काढत नाहीत, तर कर्ज माफ कोणाचे करायचे? भाताबरोबरच अन्य भाजीपाला कसा पिकवता येतो, हे कृषीभूषण राजेंद्र भट यांच्यासारख्या आपल्याच तालुक्यातील शेतकऱ्यांनी सिद्ध करून दाखवले आहे. त्यांच्या अनुभवाचा शेतकऱ्यांनी अवश्य लाभ घ्यावा. आपल्या भागातील भाजीपाला उत्पादकांसाठी शहरात खाजगीकरणातून भाजीविक्र ी केंद्र सुरू करत आहोत. याचा लाभ शेतकऱ्यांना होईल, असा विश्वास आशीष गोळे यांनी व्यक्त केला.
तालुका कृषी अधिकारी विजय पाटील, पंचायत समिती कृषी अधिकारी रवींद्र पाटील यांची यावेळी भाषणे झाली. भाजपाचे तालुकाध्यक्ष राजेश पाटील, राजेश शर्मा, ऋतुराज जोशी, सदानंद सुरोशे, महेश सुरोशे, संजय आदक आदी मान्यवर उपस्थित होते. सरपंच चित्रा पारधी यांनी स्वागत केले, तर कृषी पर्यवेक्षक सचिन केणे यांनी आभार प्रदर्शन केले.
शेतकरी उत्पादक व्हावा
आपल्या तालुक्यातील ५० टक्के शेतकरी भूमिहीन झालेले आहेत. शासनाने फुलशेती व अन्य उत्पादनाबाबत प्रशिक्षण देणे सुरू केले आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान मिळते. प्रशिक्षणासाठी जी फी भरावी लागते, ती तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती भरेल. बदलापूरमधील शेतकरी हाच आता ग्राहक झालेला आहे. यात परिवर्तन घडवून शेतकरी हा जास्त उत्पादक होणे आवश्यक आहे.