अंतिम टप्प्याची मासेमारी बंद करा, अन्यथा संघर्ष!
By admin | Published: May 24, 2017 12:55 AM2017-05-24T00:55:46+5:302017-05-24T00:55:46+5:30
समुद्रात २५ मे ते ३० मे दरम्यानच्या बंदीच्या शेवटच्या टप्प्यात समुद्रात जाऊन बंदी कालावधीत १ जून नंतर समुद्रात राहून मासेमारी करून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या मच्छीमार
हितेन नाईक ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पालघर : समुद्रात २५ मे ते ३० मे दरम्यानच्या बंदीच्या शेवटच्या टप्प्यात समुद्रात जाऊन बंदी कालावधीत १ जून नंतर समुद्रात राहून मासेमारी करून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या मच्छीमार व त्यांच्या बोटीवर मत्स्यव्यवसाय विभागाने कडक कारवाई करावी अन्यथा संघर्ष उद्भवेल असा इशारा सातपाटी मच्छीमार संस्था व सर्वोदय मच्छीमार संस्थेने आयुक्तांना दिला आहे.
महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियमांन्वये १ जून ते ३१ जुलै हा अवघ्या ६१ दिवसाचा कालावधी हा पावसाळी मासेमारी बंदी कालावधी मच्छीमारीसाठी बंद असतो. वादळी वाऱ्यामुळे होणारी जीवितहानी, वित्तहानी टाळली जावी व प्रजनना नंतर पिल्लाची पोषक वाढ होऊन हंगामात मुबलक मच्छी उपलब्ध व्हावी हा या मागचा उद्देश आहे. या पावसाळी मासेमारी बंदी कालावधीची अंमलबजावणी पालघर जिल्ह्यातील मच्छिमार काटेकोरपणे करीत आले आहेत. मात्र रायगड,गुजरात मधील काही मच्छीमारीसाठी ससून डॉक (गोदी), कुलाबा येथे वर्षभर येत असतात. तेथून ते पावसाळी बंदी कालावधीच्या आधी २५ ते २८ मे ला कुलाबा बंदरातून माघारी जातांना १ जून नंतर १२ ते १५ दिवस पावसाळी बंदी कालावधीत समुद्रात मासेमारी करतात व त्यांची विक्री आपल्या गावाकडील बंदरात करतात. मुंबई शहर, मुंबईउपनगर, ठाणे जिल्ह्यातील उत्तन तर रायगड जिल्ह्यातील काही मच्छीमारही अशाच पद्धतीने मासेमारी करीत असल्याचे अनेक वर्षांपासून निदर्शनास आले आहे. हे पावसाळी मासेमारी बंदी कायद्याचे सर्रास उल्लंघन होत असल्याने या नौकाद्वारे पकडण्यात आले मासे विक्रीसाठी कुठल्याही बंदरात उतरवू देऊ नयेत. प्रत्येक बंदरावरील परवाना अधिकाऱ्यांनी या बोटीवर लक्ष ठेवून प्रत्येक मासळी उतरविण्याच्या बंदरावर त्या दृष्टीने बंदोबस्त ठेवावा अशी मागणी करण्यात आली असून असे प्रकार आढळल्यास त्यांच्यावर महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियमान्वये कारवाई करावी अशी मागणी सातपाटी सर्वोदय सहकारी संस्थेचे चेअरमन रवींद्र म्हात्रे आणि सातपाटी मच्छीमार संस्थेचे चेअरमन राजन मेहेर यांनी मत्स्यव्यवसाय आयुक्तां कडे केली आहे.