शिवसेना शहरप्रमुखांच्या प्रभागातील बेकायदा बांधकाम थांबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:40 AM2021-03-05T04:40:04+5:302021-03-05T04:40:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : केडीएमसी हद्दीतील बेकायदा बांधकामाचा मुद्दा विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चांगलाच गाजत आहे. त्यावर शिवसेनेचे राजेश ...
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : केडीएमसी हद्दीतील बेकायदा बांधकामाचा मुद्दा विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चांगलाच गाजत आहे. त्यावर शिवसेनेचे राजेश कदम यांनी भाजपवर बुधवारी टीका केली. त्याला प्रत्युत्तर देताना नुकतेच भाजपमध्ये आलेले माजी नगरसेवक मंदार हळबे म्हणाले, शिवसेनेने आधी शहरप्रमुख राजेश मोरे यांच्या दत्तनगर प्रभागात सुरू असलेल्या बेकायदा बांधकाम पाडून दाखवावे. सत्ता तुमची असल्याने ते सहजशक्य आहे, असा टोला हाणला.
हळबे पुढे म्हणाले की, ‘महापालिकेत भाजप आता विरोधी बाकावर, तर शिवसेना सत्तेत आहे. त्यामुळे बेकायदा बांधकामावर कारवाई करण्यासाठी सत्ताधारी शिवसेनेने प्रशासनाला धारेवर धरून कारवाई करावी. भाजपही सत्तेत होती, परंतु बेकायदा बांधकामावर कारवाई होत नसल्याने नाराजी व्यक्त करत भाजपने सत्ता सोडली. आता तर कारवाईचा धडाका लावून ‘करून दाखवण्याची’ शिवसेनेला संधी आहे. पण तसे काही होत नसल्याने नेमके बेकायदा बांधकामांना कोण खतपाणी घालत आहे, हे स्पष्ट होत आहे.’
दत्तनगरमध्ये प्रजासत्ताकदिनी भव्य दिव्यअसा झेंडावंदनाचा कार्यक्रम झाला. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, पोलीस उपायुक्त विवेक पानसरे आदी उपस्थित होते. त्यांच्यासमोरच बेकायदा बांधकाम उभे राहत आहे. त्यावर महापालिकेने तत्काळ कारवाई करायला हवी. कदम यांनी त्याकडेही लक्ष वेधणे गरजेचे आहे. तसेच मनपा क्षेत्रात अन्यत्र जिथे काम सुरू आहे, त्यावरही हातोडा मारावा, त्याचा पाठपुरावा करण्यासाठी जे सहकार्य लागेल ते करण्याची तयारीही हळबे यांनी दर्शविली. या महापालिका क्षेत्रात शिवसेनेचेही आमदार आहेत, हे कदम यांनी विसरू नये असेही ते म्हणाले.
खरे तर बेकायदा बांधकामांवरील कारवाईसाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी एकत्र येण्याचे आवाहन हळबे यांनी केले.
-----------
भाजपला पळवाट काढण्याची सवय आहे, त्यामुळे मूळ प्रश्नाला त्यांनी बगल देऊ नये. विधानसभेत प्रश्न आल्यावर त्यांच्या पक्षाचे आमदार का बोलले नाहीत हे महत्त्वाचे आहे. त्याचे त्यांनी उत्तर द्यावे.
- राजेश कदम, शिवसेना, डोंबिविली
----------------