कल्याणमध्ये पाण्यासाठी नागरिकांचा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2016 12:45 AM2016-01-07T00:45:50+5:302016-01-07T00:45:50+5:30
कल्याण-डोंबिवली पालिकेच्या हद्दीत सध्या असलेल्या ३० टक्के पाणीकपातीमुळे आधीच नागरिक मेटाकुटीला आलेले असतानाच पत्रीपूल परिसरात गेल्या आठ
कल्याण : कल्याण-डोंबिवली पालिकेच्या हद्दीत सध्या असलेल्या ३० टक्के पाणीकपातीमुळे आधीच नागरिक मेटाकुटीला आलेले असतानाच पत्रीपूल परिसरात गेल्या आठ दिवसांपासून पाणी नसल्याने नागरिक रस्त्यावर उतरले.
कल्याण-डोंबिवली महापालिका आणि औद्योगिक विकास महामंडळाकडे दाद मागूनही तोडगा निघत नसल्याने संतप्त नागरिकांनी कल्याण-शीळ रस्त्यावरील पत्रीपुलावर रास्ता रोको आंदोलन करत दीड तास वाहतूक रोखून धरली.
शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक नवीन गवळी, काँग्रेसचे पदाधिकारी शकील शेख, माजी नगरसेविका प्रतिमा जाधव, त्यांचे पती सुरेश जाधव, स्थानिक पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते अशोक कांबळे यांच्यासह शेकडो नागरिक रस्त्यावर उतरल्याने वाहतूक पुरती कोलमडली.
पत्रीपूल परिसराला औद्योगिक विकास महामंडळाकडून पाणीपुरवठा केला जातो. या परिसरातील नागरिक त्या पाण्याची बिले नियमितपणे महापालिकेत भरतात. त्यानंतरही पाणी मिळत नसल्याचा मुद्दा येथे सतत येतो. गेले आठ दिवस पाणी मिळत नसल्याने आधीच येथे संताप खदखदत होता. एमआयडीसीच्या ३० टक्के कपातीच्या धोरणामुळे आठवड्यातून दोन दिवस पाणी येत नाही. पण, उरलेले पाच दिवस कोणतेही कारण न देता पाणीपुरवठा बंद असल्याने नागरिकांनी आधी एमआयडीसीकडे आणि नंतर महापालिकेकडे दाद मागितली. पण, फरक न पडल्याने नागरिक रस्त्यावर उतरले. पिण्यासाठी पाणी नसल्याने, घरात वापरायला पाणी नसल्याने त्रासलेल्या महिला यात मोठ्या प्रमाणात होत्या. जेवण बनविण्यासाठीही ७० रुपये मोजून बाटलीबंद पाणी आणावे लागत होते. तो संताप मोर्चातून व्यक्त झाला.
२७ गावांना पाणी महामंडळाकडून पुरविले जाते. ही गावे महापालिकेत समाविष्ट झालेली आहेत. त्यांना सुविधा पुरवण्याबाबत महामंडळाकडून हात वर केले जातात. काही दिवसांपूर्वी या भागातील नागरिकांचे शिष्टमंडळ आयुक्त व महापौरांना जाऊन भेटले होते. त्यांनी पाणीप्रश्नावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, परिस्थिती जैसे थे राहिली.