विकासाच्या नावाखाली रहिवाश्यांचा श्वास हिरावून घेणे बंद करा; मीरारोडच्या शांती नगरवासियांचा पालिकेला इशारा
By धीरज परब | Published: December 21, 2022 05:08 PM2022-12-21T17:08:28+5:302022-12-21T17:08:37+5:30
शांती नगर हे शहरातील सर्वात मोठे गृहसंकुल असून सदर संकुलातील रस्ता रुंद करणे तसेच गटार बांधण्याच्या नावाखाली महापालिकेने मोठ्या संख्येने येथील मोठमोठ्या झाडांची तोड चालवली आहे. आता पुन्हा गटार बांधायचे म्हणून झाडे तोडण्याचा घाट पालिकेने घातला आहे.
मीरारोड - मीरारोडच्या शांती नगरमधील असंख्य झाडे आधीच विकासकामांच्या नावाखाली तोडून टाकली आहेत. पुन्हा पुन्हा कामे काढायची आणि झाडे तोडायची असला रहिवाशांचा श्वास हिरावून घेणारा कारभार पालिकेने बंद करावा, असा इशारा शांती नगरच्या नागरिकांनी दिलाय. झाडे तोडण्याच्या विरोधात नागरिकांनी स्वाक्षरी मोहीम चालवली आहे.
शांती नगर हे शहरातील सर्वात मोठे गृहसंकुल असून सदर संकुलातील रस्ता रुंद करणे तसेच गटार बांधण्याच्या नावाखाली महापालिकेने मोठ्या संख्येने येथील मोठमोठ्या झाडांची तोड चालवली आहे. आता पुन्हा गटार बांधायचे म्हणून झाडे तोडण्याचा घाट पालिकेने घातला आहे.
पालिकेने ४० झाडे तोडण्याचा घाट घातला असून झाडे तोडायला आलेल्यांचा नागरिकांनी विरोध केल्या नंतर ती कार्यवाही तूर्तास थांबवण्यात आली आहे. झाडे तोडण्याच्या विरोधात स्थानिक नागरिक असलेले डॉ. नयना वसाणी , दृष्टी व दिलीप घाग, प्रमोद दर्जी , नरेश जैन, मिलन भट, विनोदा कोटियां आदींनी मंगळवारी रात्री सेक्टर १० च्या स्वामीनारायण मंदिर बाहेर सह्यांची मोहीम राबवली.
झाडे तोडू नये म्हणून तक्रारी देऊन सुद्धा पालिका दाद देत नाही. ठेकेदारांच्या फायद्यासाठी पुन्हा पुन्हा गटारचे काम काढले जाते व त्यासाठी झाडांचा बळी दिला जातो. गटार मोठी करून फेरीवाल्याना बसवायचे आहे का ? विकासाच्या नावाखाली झाडे तोडायची हे सहन करणार नाही असा संताप यावेळी नागरिकांनी बोलून दाखवला.
झाडं मोठी व्हायला किती तरी वर्ष लागतात. कोरोना काळात ऑक्सिजन नाही म्हणून लोकांची जीव गेले. आम्हाला घरा जवळ ऑक्सिजन देणारी व कार्बन शोषून घेणारी झाडे हवी आहेत. तुमचा पैसेखाऊ विकास नको. शांती नगरच्या लोकांनी स्वच्छ ऑक्सिजनसाठी काय नेशनल पार्क वा उत्तन - गोराईला जायचे का ? असा सवाल यावेळी डॉ. नयना वसाणी , दृष्टी घाग आदींनी केला.