विकास कामांना रोखणाऱ्या शत्रूला रोखा, नरेंद्र मोदींचे ठाण्यात आवाहन
By अजित मांडके | Published: October 5, 2024 07:45 PM2024-10-05T19:45:17+5:302024-10-05T19:47:17+5:30
Narendra Modi : महायुतीचे सरकार आले आणि विकास कामांचा वेग वाढला, वाहतुकीचा वेग वाढला त्यामुळं आता मुबंई ठाणे जवळ येण्यास मदत झाली आहे. नवनवीन प्रकल्पामुळे रोजगार संधी आणि नवीन उद्योग येण्यास वाव मिळेल असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला.
ठाणे : आमचे सरकार महाराष्ट्राच्या विकासालाच फक्त आपले लक्ष मानत आहे. मात्र महाविकास आघाडी सरकार हे केवळ विकास कामांना लटकवणारे, थांबवणारे आणि लोकांची दिशा भूल करणारे असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. त्यामुळे अशा महाविकास विरोधी शत्रूंना सत्तेबाहेरच रोखा आणि महायुतीचे प्रामाणिक सरकार निवडून द्या, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
ठाणे घोडबंदर, वालावलकर मैदानामध्ये आयोजित कार्यक्रमात मोदी बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते ठाणे अंतर्गत मेट्रो, नवीन महापालिका मुख्यालय, उन्नत मार्ग विस्तार छेडा नगर ते ठाणे आनंद नगरपर्यंत, नेना नगर रचना अंर्तगत विकास कामे यांचे भूमिपूजन, मुंबई मेट्रो मार्ग ३ टप्पा एक लोकपर्ण आणि लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांचा सत्कार यावेळी मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मोदी यांना पेठा, ठाण्यातील कोपीनेश्वर मंदिर मधील शिवलिंग आणि आणि दुर्गेश्वर मातेची प्रतिमा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली.
यावेळी व्यासपीठावर राज्याचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, अदिती तटकरे, संजय शिरसाठ, शंभूराज देसाई, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मोदी यांनी ही टीका केली. आम्ही राज्याचा विकास करताना महाविकास आघाडीचे खड्डे भरण्याचे कामही करत असल्याचे त्यांनी सांगितले. महाविकास आघाडीने ठाणे आणि मुंबईकडे दुर्लक्ष केले, वाहतूक कोंडीकडे कोणीच लक्ष दिले नाही, विकास कामे बंद केली, त्यामुळे मुंबई ठप्प होते की काय काही परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र महायुतीचे सरकार आले आणि विकास कामांचा वेग वाढला, वाहतुकीचा वेग वाढला त्यामुळं आता मुबंई ठाणे जवळ येण्यास मदत झाली आहे. नवनवीन प्रकल्पामुळे रोजगार संधी आणि नवीन उद्योग येण्यास वाव मिळेल असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला.
महायुती सरकार महाराष्टाच्या विकासाला आपले लक्ष मानते. मात्र, महाविकास आघाडीकडून कामे रोखण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्याचे उदाहरण म्हणजे मुंबई मेट्रो ३. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना या मेट्रो प्रकल्पाचे ६० टक्के काम पूर्ण झाले होते. त्यात महाविकास आघाडीने खोडा घालीत काम अडीच वर्षे थांबवले होते. त्यामुळे या प्रकल्पाच्या किमतीत १४ हजार कोटींची वाढ झाल्याचे देखील मोदी यांनी सांगितले. मात्र हा राज्यातील करदात्या जनतेचा होता, केवळ त्यांच्या अहंकारामुळे हे काम थांबल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
मविआ सत्तेत होते तेव्हा बुलेट ट्रेन रोखली, राज्याची तहान भागवणा-या योजना रोखल्या, त्यामुळं आता तुम्हाला यांना रोखायचे आहे, विकासच्या या दुश्मनांना रोखायचे आहे. काँग्रेस सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी असल्याचा आरोपही त्यांनी केला. काँग्रेसचे चरित्र कधीच बदलत नाही, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचा जमीन घोटाळा समोर आला, एकाला ड्रग्ससहित पकडले, नवीन नवीन टॅक्स लावून पैसे लाटणे हाच काँग्रेस सरकारचा अजेंडा असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. आम्ही टॉयलेट उभारण्याचे काम करत आहोत, मात्र हिमाचलमध्ये कॅांग्रेस सरकारे टॅायलेटवर टॅक्स लावलाय, एकूणच काँग्रेस लूट, भ्रष्टाचार, फसवणूक आणि कुशासनाचे पूर्ण पेकेज असल्याची टीकाही त्यांनी केली.
महिलांना शिव्या देणे, युवा पिढी खराब करण्याचे काम काँग्रेस करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. जेव्हा पासून कॅांग्रेस सत्तेतून बाहेर झालीये तेव्हा त्यांचा खरा चेहरा समोर आला आहे. काँग्रेस अर्बन नक्सलबरोबर आहे, हे आता स्पष्ट झाले आहे. त्यांना माहितीये त्यांची एक वोट बॅंक एकच आहे, त्यामुळे ते आता इतरांमध्ये फुट टाकून सत्तेत येण्याचा प्रयत्न करत आहेत. जर आपण विखुरलो तर ते आनंद साजरा करतील, त्यांचे मनसुबे सफल होऊ देऊ नका असा सल्लाही त्यांनी दिला. काँग्रेसने देशाला गरिबीत ढकलले त्यांच्या सोबत आलेले पक्ष सुद्धा बर्बाद होत आहेत. राष्ट्रवाद बोलणारे आता तुष्टीकरण करत आहेत, वक्फ बोर्ड बिलाला विरोध करत आहेत. जम्मू कश्मिर मध्ये ते कलम ३७० लागू करणार असं बोलत आहेत. काँग्रेसचे भूत ज्यांच्या अगांत घुसते त्यांची हिच हालत होते असा टोलाही त्यानी विरोधकांना लगावला.
विकास काम फक्त भाजपा आणि महायुती सरकार करु शकते, देशाला खुप पुढे घेवून जायचे आहे, राज्यातील लोकं महायुती सोबत उभे असेही ते म्हणाले. महाराष्ट्रात काँग्रेसवाल्यांनी आताच रंग दाखवायला सुरुवात केली, लाडकी बहिण योजनेला महाविकास आघाडीने विरोध केला, त्यांना ही योजना बंद करायची असल्याचे सांगत त्यांचे सरकार आल्यावर ते सर्वात आधी एकनाथ शिंदेवर आगपाखड करतील आणि सर्व योजना बंद करतील असा आरोपही त्यांनी केला. लाडक्या बहीण योजनेचे पैसे त्यांना त्यांच्या दलालांच्या खिशात टाकायचे आहेत. काँग्रेसपासून सावध राहण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. मुंबई आणि ठाण्याला फ्युचर रेडी बनवायचे आहे. याकरता आम्हाला डबल मेहनत करावी लागतेये,आमच्या सरकारने याकडे लक्ष दिले असल्याचेही ते म्हणाले. देशवासियांचे आता एकच लक्ष आहे विकसित भारत, यामुळे आमचा प्रत्येक निर्णय, संकल्प, स्वप्न फक्त विकसीत भारत आहे, असेही त्यांनी सांगितले.