विजय शिवतारे यांना आवरा, अन्यथा आम्ही महायुतीचा धर्म तोडू, आनंद परांजपेंचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2024 05:32 AM2024-03-21T05:32:58+5:302024-03-21T05:34:44+5:30
Anand Paranjpe : परांजपे म्हणाले की, शिवतारे यांच्याकडून वारंवार अजित पवार यांच्याविरोधात आगपाखड सुरू आहे.
ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजय शिवतारे यांची समजूत काढूनही ते सातत्याने बारामती लोकसभेमध्ये फिरून महायुतीचे वातावरण खराब करीत आहेत. याचा अर्थ शिंदे यांचे आपल्या नेत्यांवर नियंत्रण नाही. शिवतारे महायुतीचा धर्म तोडत राहिले, तर शिवसेनेचा शिंदे गट लोकसभेच्या ज्या जागा लढवणार आहे, तेथे राष्ट्रवादीचे पदाधिकारीदेखील महायुतीचा धर्म तोडू शकतात, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटाचे) प्रवक्ते आनंद परांजपे यांनी बुधवारी दिला.
परांजपे म्हणाले की, शिवतारे यांच्याकडून वारंवार अजित पवार यांच्याविरोधात आगपाखड सुरू आहे. आम्हाला महायुतीचे वातावरण खराब होईल, असे कृत्य करायचे नाही. मात्र, शिवतारे यांच्या कृत्यामुळे शिंदे यांचे आदेश त्यांचेच नेते ऐकत नाहीत, असा संदेश महाराष्ट्रात जात आहे. शिवतारे यांना पुरंदरच्या जनतेने २०१९ मध्ये त्यांची जागा दाखवली आहे.
कल्याणमधील भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र पाठवून मतदारसंघाची मागणी केली असल्याबद्दल परांजपे म्हणाले की, कल्याण मतदारसंघात आपल्या पक्षाचा उमेदवार व चिन्ह असावे, ही भावना असणे स्वाभाविक आहे. त्यात काही गैर नाही. कल्याण लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे तीन आमदार आहेत. गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर राज ठाकरे यांची काय राजकीय चर्चा झाली आम्हाला माहीत नाही. जो निर्णय होईल तो आम्हाला मान्य असेल, असेही त्यांनी सांगितले.
मंत्रिपद का नाही?
संग्राम थोपटे यांना काँग्रेसच्या कोट्यातून मंत्रिपद का मिळाले नाही? त्यांनी आमच्यावर आरोप करण्यापेक्षा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांना प्रश्न विचारला, तर ते अधिक संयुक्तिक राहील, असा सल्ला परांजपे यांनी दिला.