दिव्यांगांचा कल्याणमध्ये रास्ता रोको
By admin | Published: July 8, 2017 05:22 AM2017-07-08T05:22:45+5:302017-07-08T05:22:45+5:30
दिव्यांग (अपंग)व्यक्तींना समान संधी आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण, अधिकार यासंदर्भात मंजूर केलेल्या कायद्याची कल्याण-डोंबिवली
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : दिव्यांग (अपंग)व्यक्तींना समान संधी आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण, अधिकार यासंदर्भात मंजूर केलेल्या कायद्याची कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून होत असलेल्या पायमल्लीच्या निषेधार्थ राष्ट्रीय अपंग विकास महासंघ (महाराष्ट्र राज्य) या संघटनेने बुधवारपासून शिवाजी चौकात बेमुदत उपोषण छेडले होते. परंतु, याकडे दुर्लक्ष होत असल्याप्रकरणी शुक्रवारी उपोषणकर्त्यांनी शिवाजी चौकात रास्ता रोको केला. यामुळे २० मिनिटे या मार्गावरील वाहतूक खोळंबली होती. दरम्यान, दिव्यांगांच्या शिष्टमंडळाने उपायुक्त नितीन नार्वेकर भेट घेत चर्चा केली. या वेळी बहुतांश मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्यामुळे उपोषण मागे घेत असल्याची माहिती संघटनेचे संचालक अशोक भोईर यांनी दिली.
महापालिका हद्दीतील दिव्यांगांच्या मागण्यांसंदर्भात प्रशासनाला वारंवार निवेदने देऊन बैठका घेऊनही प्रश्न प्रलंबितच राहिले असल्याकडे संघटनेने लक्ष वेधले होते. दिव्यांग व्यक्तींच्या प्रश्नांसंदर्भात खासदार, आमदार व नगरसेवक आदी लोकप्रतिनिधींनी केलेल्या पत्रव्यवहारालाही प्रसंगी केराची टोपली दाखविली जात आहे. दिव्यांगांच्या उत्कर्षासाठी केलेल्या कायद्याचीही केडीएमसी प्रशासनाकडून सर्रासपणे हेटाळणी केली जात असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला होता.
महापालिकेची महासभा आणि सरकारच्या नगरविकास विभागाने दिव्यांगांना स्टॉलचे परवाने देण्याबाबत धोरण मंजूर केले आहे. मात्र, आयुक्तांनी त्यावर हुकूमशाही पद्धतीने बंदी लादली आहे. ही बंदी त्वरित उठवून रहदारीस अडथळा न ठरणाऱ्या जागांवर दिव्यांगांना स्टॉल परवाना मंजूर करावेत, सवलतीच्या दरात गाळे/ओटे वितरित करण्याचे सामाजिक न्याय विभागाचे निर्देश असूनही केडीएमसीने याकडे कानाडोळा केला आहे. त्याची पूर्तता व्हावी, संत सावता माळी भाजीमंडईतील पहिल्या मजल्यावर दिव्यांग व्यक्तींसाठी गाळे आरक्षित होते.
परंतु, गैरमार्गाने इतरांना त्याचे वाटप झाले आहे. त्यामुळे ते गाळे त्यांच्याकडून ताब्यात घेऊन दिव्यांगांना द्यावेत, दिव्यांगांना सोयी-सुविधा पुरवण्याबाबत महासभेने केलेल्या ठरावानुसार बचत गट आणि दिव्यांगांना सात दिवसांत निधीचे वितरण करावे, दिव्यांग निधीचा वापर गटार-पायवाटा बांधण्यासाठी कसा झाला, याची चौकशी व्हावी, अशा त्यांच्या मागण्या होत्या.
दोघे जण रुग्णालयात
उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी शुक्रवारी दोघा उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी रु ग्णालयात दाखल करण्यात आले.
महापालिका उपोषणाची दखल घेत नसल्याच्या निषेधार्थ रोष व्यक्त करत रहदारीच्या वेळेत उपोषणकर्त्यांनी शिवाजी चौकात २० मिनिटे रास्ता रोको केला. या वेळी स्थानिक पोलिसांनी हस्तक्षेप करून त्यांची समजूत काढली. त्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला.