विधिमंडळाचे काम बंद पाडू
By admin | Published: July 7, 2017 06:31 AM2017-07-07T06:31:55+5:302017-07-07T06:31:55+5:30
जमीन परत मागण्यासाठी आंदोलन करणाऱ्या नेवाळीतील शेतकऱ्यावर पोलिसांनी गोळीबार केला. गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : जमीन परत मागण्यासाठी आंदोलन करणाऱ्या नेवाळीतील शेतकऱ्यावर पोलिसांनी गोळीबार केला. गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल केले. हे आंदोलन न्याय्य हक्कासाठी होते. ते पोलिसांनी चिरडले. शेतकऱ्यांना गुन्हेगार ठरवले. जर नेवाळीच्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही; तर विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे काम बंद पाडू, असा इशारा शिवसेनेचे आमदार सुभाष भोईर यांनी दिला.
नेवाळीतील शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायासंदर्भात पुढील दिशा आणि भूमिका ठरवण्यासाठी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील आगरी, कोळी आणि कुणबी समाजाची भव्य सभा सावित्रीबाई नाट्यमंदिरात गुरूवारी पार पडली. तिला प्रचंड गर्दी झाली होती. त्यात बोलतना आमदार भोईर यांनी हा इशारा दिला.
या बैठकीला खासदार कपील पाटील, आमदार भोईर, गणपत गायकवाड, रुपेश म्हात्रे, विवेक पाटील, माजी आमदार रमेश पाटील, भाजप नेते जगन्नाथ पाटील, मनसेचे सरचिटणीस राजू पाटील, उपमहापौर मोरेश्वर भोईर, सभागृह नेते राजेश मोरे, स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे, संघर्ष समितीचे पदाधिकारी गुलाब वझे, गंगाराम शेलार, अर्जुन चौधरी, काँग्रेस पक्षाचे संतोष केणे, कुणबी सेनेचे विश्वनाथ पाटील, आगरी सेनेचे राजाराम साळवी आदी विविध पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते यांच्यासह नेवाळीतील शेतजमीन परत करण्याची मागणी करणारे ग्रामस्थ उपस्थित होते.
आमदार भोईर भाषणासाठी उठताच, ‘आता भाषणबाजीचा कंटाळा आला आहे. पुढचे काय ते बोला,’ अशी संतप्त प्रतिक्रिया उपस्थितांतून व्यक्त झाली. त्यावर भोईर यांनी भाषण थांबवून सगळ््यांना शांत राहण्याचे आवाहन केले आणि या प्रश्नावर विधिमंडळाचे कामकाज बंद पाडण्याचा इशारा दिला. त्यांच्या इशाऱ्याला आमदार रुपेश म्हात्रे यांनी दुजोरा दिला. सर्व लोकप्रतिनिधी त्यांच्या परीने नेवाळीच्या शेतकऱ्यांच्या न्यायासाठी सरकारकडे दाद मागतील, असेही जाहीर करण्यात आले. भिवंडीतील दोन पोलिसांना जमावाने ठेचून मारले, तेव्हा पोलिसांनी बळाचा वापर का केला नाही, असा सवाल आमदार म्हात्रे यांनी उपस्थित केला आणि पोलिसांचे बळ फक्त आगरी समाजावर चालते का, अशी संतप्त टीका केली.
शेतकऱ्यांनी न्याय्य हक्कासाठी आंदोलन केले. पण त्यांना गुन्हेगाराची वागणूक दिली जाते. हा गुन्हा राजकीय स्वरुपाचा आहे. राज्यात अट्टल गुन्हेगार सुटतात, पण शेतकऱ्यांना जामीन मिळकत नाही. नेवाळीचे आंदोलन करणारा आंदोलक दलित किंवा मुस्लिम असता तर पोलिसांनी बळाचा वापर केला असता का, अशी टीका अनंत तरे यांनी केली. आगरी समाज गुन्हेगारीपासून दूर होत आहे. पुन्हा त्याला गुन्हेगारीत ढकलून कायदा हातात घेण्यास भाग पाडू नका, असाही इशारा तरे यांनी दिला.
पोलिसांनी नेवाळीतील आंदोलनकर्त्यांना अटक केली आणि त्यांच्या गुप्त भागावर पेट्रोल लावून मीठ चोळण्याचा प्रकार घडला आहे. त्यांच्यावर थर्ड डिग्रीचा वापर झाला आहे, अशी माहिती देत आमदार गणपत गायकवाड म्हणाले, हा प्रकार ऐकून मला खूप वाईट वाटले. मी जर त्या शेतकऱ्यांना न्याय देऊ शकत नसेन, त्यांचे संरक्षण करु शकत नसेन तर अशा राजकारणात राहून काय उपयोग आहे. मी राजकारण सोडण्याचा विचार करतो आहे.
आंदोलनकर्ते गुन्हेगार नाहीत. पण त्यांना गुन्हेगार ठरविले जात आहे. आजची सभा घेणाऱ्यांवरही पोलिसांनी दबाव टाकला होता. नेवाळीच्या आंदोलनकर्त्यांवर पोलीस कोठडीत जे अत्याचार सुरु आहे. त्या विरोधात शुक्रवारी पोलीस आयुक्तांच्या कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशाराही गायकवाड यांनी दिला.
‘पोलिसांनी तोडपाणी केले’
एकच आरोपी तीन ठिकाणी दाखवून त्याला गुन्हेगार केले जात आहे. ३०७ कलमाचा वापर करुन त्यांनी खुनी ठरविले जात आहे. पोलिसांनी दोन आरोपींना सोडविण्यासाठी ५० हजार रुपयांचे तोडपाणी केले.
पोलिसांना शेतकऱ्यांनी जशास तसे उत्तर दिल्याने त्यांचा स्वाभिमान दुखावला आणि त्यांनी आकसापोटी शेतकऱ्यांची धरपकड सुरु केली.
त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल केले. त्याच पोलिसांनी ५० हजार रुपयांची तोडपाणी केली, तेव्हा त्यांचा स्वाभिमान कुठे गेला होता? असे प्रश्नही गायकवाड यांनी विचारले.