बोईसर ट्रेनचा रेल रोको करणे चांगलेच महागात; दहापैकी आणखी सात जणांचा शोध सुरू
By अनिकेत घमंडी | Published: September 2, 2022 07:43 PM2022-09-02T19:43:49+5:302022-09-02T19:44:03+5:30
पाच पथक भिवंडी, कामण रोड पट्ट्यात रवाना; आरपीएफ, लोहमार्ग पोलीस यंत्रणांनी नोंदवले गुन्हे
डोंबिवली: बोईसर येथे जाणारी ट्रेन लेट झाल्याने संतप्त प्रवाशांनी ती गाडी कामण रोड रेल्वे स्थानकात रोखून ठेवल्याची घटना मंगळवारी घडली होती, त्या घटनेची रेल्वे प्रशासनाने गंभीर दखल घेत दहा जणांविरुद्ध डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून त्यापैकी तीन जणांना अटक झाली असून शुक्रवारी त्याना जेल कस्टडीत पाठवण्यात आले.
अन्य सात जणांचा शोध सुरू आहे. त्यासाठी लोहमार्ग पोलिसांची पाच पथक तैनात करण्यात आली असून त्यामद्ये प्रत्येक पथकात एक अधिकारी दोन अंमलदार असा पोलिसांचा समावेश आहे. ट्रेन अडवलेल्यांवर भारतीय रेल्वे ऍक्टनुसार गुन्हे तसेच लोहमार्ग पोलिसांनी जमाव तयार करणे, सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण, दमदाटी, धक्काबुक्की करणे यांसह अन्य कलमाखाली गुन्हे नोंदवले आहेत.
त्या घटनेत कोणतीही राजकीय मंडळींचा समावेश नसल्याचेही तपास यंत्रणेने स्पष्ट केले, ज्यांनी गाडी थांबवली ते खासगी कंपनीत नोकरी करणारे असल्याचे सांगण्यात आले. ट्रेन लेट झाली किंवा अन्य कोणत्याही कारणाने प्रवाशांनी राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान करणे, सरकारी कामात अडथळा आणणे, शासकीय कर्मकार्यावर हात उचलणे, धमकी देणे असे।प्रकार करू नयेत. अन्यथा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होऊन असे प्रकार करणाऱ्यांच्या भविष्यावर देखील परिणाम होऊ शकतो, याची सगळ्यांनी नोंद घ्यावी असे आवाहन सुरक्षा यंत्रणेने केले आहे.