वादळीवाऱ्यांनी पालघरला झोडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 05:12 AM2020-06-05T05:12:33+5:302020-06-05T05:12:36+5:30
वृक्ष कोसळून घरांचे नुकसान : सुदैवाने जीवितहानी नाही
हितेन नाईक ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पालघर : निसर्ग चक्रीवादळाचे संकट टळल्याने निश्चिंत झालेल्या पालघरवासीयांना गुरुवारी पहाटेपासून कोसळणाºया मुसळधार पाऊस आणि जोरदार वादळी वाऱ्यांनी झोडपून काढले. या घटनेत अनेक घरांवर वृक्ष कोसळण्याबरोबरच अनेकांच्या घरांचे पत्रे उडून घरातील जीवनावश्यक वस्तू भिजल्या. या घटनेत सुदैवाने जीवित हानीची घटना घडली नाही. दरम्यान, वसई-विरार परिसरातही ४० झाडे पडण्याच्या घटना घडल्या.
निसर्ग चक्रीवादळाने मार्ग बदलल्याने पालघरवासीयांनी सुटकेचा निश्वास टाकला होता. परंतु गुरुवारी पहाटे अचानक जोरदार वादळी वारे सुटून मुसळधार पाऊस सुरू झाला. बुधवारी टळलेले संकट पुन्हा अवतरले की काय? अशी भीती सर्वच लोकांच्या मनात निर्माण झाली. गुरुवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पालघर शहराच्या पूर्वेकडील सुनील प्रजापती यांच्या घराजवळील मोठे झाड कोसळले.
या वेळी प्रजापती यांची पत्नी, आई-वडील, भावाची पत्नी, त्यांची दोन मुले असे ९ जणांचे कुटुंब घरात झोपले होते. या घटनेमुळे कुणाला दुखापत झाली नसली तरी घरातील सर्व इलेक्ट्रॉनिक साहित्य, जीवनावश्यक वस्तू, कपडे आदी महत्त्वपूर्ण वस्तू भिजून खराब झाल्या, तर दुसरीकडे तालुक्यातील नानिवली येथील शेतकरी दाजी उघडे यांच्या घरावरील पत्रे उडून गेल्याने व काही पत्रे फुटल्याने घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले. या जोरदार वारा आणि पावसामुळे पालघर विद्युत वितरण विभागाच्या ६ सब स्टेशनचा विद्युत पुरवठा १-२ तासांसाठी खंडित करावा लागल्याचे अधीक्षक अभियंत्या किरण नगावकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
मच्छीमारांचेही नुकसान
पालघर जिल्ह्यातील वसई, पालघर, डहाणू तालुक्यातील किनाºयावर राहणाºया मच्छीमारांनी वाळत घातलेले मासे पावसाने भिजल्याने नुकसान भरपाईची मागणी अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी केली आहे. जिल्ह्यात नुकसान झालेल्या काही किरकोळ घटनांचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.