‘ऐका ऐकवते शेतकऱ्याची कहाणी, उभं राहील तुमच्या डोळ्यांत पाणी’
By Admin | Published: January 8, 2017 02:39 AM2017-01-08T02:39:51+5:302017-01-08T02:39:51+5:30
‘ऐका ऐकवते एका शेतकऱ्याची कहाणी, उभं राहील क्षणभर तुमच्या डोळ्यांत पाणी...’ सुभेदारवाडा शाळेतील इयत्ता आठवीतील विद्यार्थिनी नूपुर गुप्ते हिने कर्जबाजारीपणाला
कल्याण : ‘ऐका ऐकवते एका शेतकऱ्याची कहाणी, उभं राहील क्षणभर तुमच्या डोळ्यांत पाणी...’ सुभेदारवाडा शाळेतील इयत्ता आठवीतील विद्यार्थिनी नूपुर गुप्ते हिने कर्जबाजारीपणाला कंटाळून मृत्यूला कवटाळणाऱ्या बळीराजाची व्यथा कवितेमधून मांडली आणि उपस्थितांचे मन हेलावले.
कल्याणमधील विद्यार्थी साहित्य संमेलनानिमित्त आयोजित विद्यार्थी कविता सादरीकरण स्पर्धेत अनेक विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या विषयांवरील कविता सादर केल्या. नूपुरची कविता सगळ्यांनाच अंतर्मुख करणारी ठरली. राजश्री माने या विद्यार्थिनीने ‘माझ्या स्वप्नातील भारत’ ही कविता सादर केली. स्वप्नातील भारतात मुली सुरक्षित असतील, तो स्वच्छ असेल, ही कल्पना मांडली होती. सध्या ‘स्वच्छ भारत’ आणि ‘बेटी बचाव अभियान’ सुरू आहे. हे अभियान प्रत्यक्षात यावे, ते केवळ स्वप्न ठरू नये, अशी भावना राजश्री हिच्या कवितेतून व्यक्त झाली. पूर्वा या विद्यार्थिनीने ‘तुझ्याविना आई माझी भूक भागायची नाही, पोरके करून गेलीस, खरंच इतकी कच्ची होती का तुझ्यामाझ्यातील नाळ’ ही कविता सादर करून आईविना पोरक्या मुलीच्या खडतर जीवनाचे भावोत्कट वर्णन केले. इयत्ता चौथीच्या वर्गात शिकणारी मेहरूफ शेख या विद्यार्थिनीने ‘शेतावरती जाऊ या, संगतीने गाऊ या’ ही कविता अत्यंत धीटपणे बोलून दाखवली. के.सी. गांधी विद्यालयातील अस्मी जोशी हिने ‘आमच्या गल्लीत आला एक पोपट, करू लागला सारखी वटवट’ ही कविता सादर करून आपली पक्षिनिरीक्षण शक्ती किती दांडगी आहे, याचा प्रत्यय दिला. अस्मी कल्याणच्या बारावे जलशुद्धीकरण केंद्राजवळ राहते. त्याठिकाणी पाणी पिण्याकरिता दररोज अनेक पक्षी येतात. त्यांचे निरीक्षण करताना तिला हे काव्य स्फुरले. हर्षवर्धन माने या विद्यार्थ्याने ‘माणूस शेवटी सारंच सोडून जातो’ ही कविता सादर केली, तर सायली सुरोसे या विद्यार्थिनीने ‘पाऊस’ ही कविता सादर केली. ‘माझ्या कवितेला दिले पावसाचे नाव, पानाफुलांना कळाले पावसाचे भाव..’,असे पावसाचे शब्दचित्र रेखाटले होते. अस्मिता जगताप याने ‘शोध’ या कवितेद्वारे ‘माणूस हरवतोय, मागे उरलाय फक्त त्याचा शोध...’या कवितेत शहरीकरणातील माणसाच्या हरवलेपणावर प्रकाश टाकला. सोमनाथ चौरसिया याने विज्ञानवादी विचारांचा संदेश दिला.
यावेळी विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी कथाकथन केले. ‘श्वास’च्या कथालेखिका माधवी घारपुरे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांसह शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. प्रा. विसूभाऊ बापट यांनी काव्यवाचन सादर केले. (प्रतिनिधी)