ठाण्यातील अत्रे कट्ट्यावर उलगडली स्त्री जन्माची कहाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 04:44 PM2018-08-09T16:44:02+5:302018-08-09T16:47:33+5:30
अत्रे कट्ट्यावर अखिल भारतीय नाट्य परिषद ठाणे शाखा निर्मित अनादी कालापासून आधुनिक काळापर्यंत स्त्री जीवनाचा प्रवास काव्यात्मकतेतून तसेच निवेदन आणि प्रासंगिक गाण्यातून अनोख्या पद्धतीने गुंफला.
ठाणे : मागील वर्षी खास महिला दिनाचे औचित्य साधून अ. भा. म. नाट्य परिषद ठाणे शाखेने एका आगळावेगळ्या अनोख्या नाट्यविष्काराची निर्मिती केली. प्रा. पद्मा हुशिंग यांच्या संकल्पनेतून आणि लेखनातून "अशी मी अशी मी "या प्रयोगातून वेदकाल ते आधुनिक कालखंडातील स्त्री जीवनाचा, तिच्या समस्यांचा आणि तिच्या कतृत्वाचा आढावा अत्रे कट्ट्यावर घेतला गेला.
या कार्यक्रमाचा मूळ गाभा हा कवितेचा आहे परंतु मनोरंजनातून प्रबोधन हा हेतू असल्यामुळे नृत्य, नाट्य, गाणे, अभिनयातून काव्य सादरीकरण आणि दृकश्राव्य माध्यमाचा प्रभावी वापर केल्यामुळे प्रथम प्रयोगापासूनच रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. मागील वर्षापासून अ. भा. नाट्यसंमेलनासहीत दहा प्रयोग झाले असून काल याच कार्यक्रमाचा साहित्यिक भाग कट्यावर पार पडला.हा कार्यक्रम दिडतासाचा असल्यामुळे निवेदन, गायन आणि कवितेतून सादरीकरण करण्यात आले. निवेदिका अश्विनी कानोलकर, गायिका अनुजा वर्तक, आणि आशा जोशी, मृदुला मराठे, जयश्री पाठक आणि स्वता:प्रा.पद्मा हुशिंग यांचा सहभाग होता. शिला वागळे यांनी कलाकारांचे स्वागत केले आणि संपदा वागळे यांनी आभार मानले. अत्रे कट्यावरील नेहमीच्या सुजाण रसिकांची उत्तम साथ मिळाली. हा मूळ कार्यक्रम अडिचतासाचा दोन अंकी नाट्य विष्कार असून त्याचाच साहित्यिक भाग दिडतासाचा सादर केला जातो. याच महिन्यात बालगंधर्व रंगमंदीर पुणे आणि पुढे औरंगाबाद, अंबाजोगाई, आणि लातूर असा "अशी मी अशी मी" प्रवास होणार आहे.अत्रे कट्यावर गेले अनेक वर्षे विविध कलांना उत्तेजन देणारे कार्यक्रम सतत होत असतात आणि येथे येणार्या सुजाण रसिक वर्गाची उत्तम दाद कलाकारांना प्रेरणा देणारी असते. कालच्या कार्यक्रमालाही जेष्ठ नागरिक तसेच तरूण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यामुळेच शेवटपर्यंत कार्यक्रम रंगत गेला..