अंबरनाथ पालिकेचा अजब कारभार; पालिकेच्या फाइल्स नेण्यासाठी ॲम्बुलन्सचा वापर
By पंकज पाटील | Published: June 27, 2023 02:31 PM2023-06-27T14:31:08+5:302023-06-27T14:31:42+5:30
रुग्णवाहिकेचा असा वापर पालिका प्रशासनामार्फत केला जात असल्याने संतापाची लाट उसळली आहे.
पंकज पाटील, अंबरनाथ: नगरपालिकेच्या जुन्या प्रशासकीय इमारतीमध्ये असलेल्या जुन्या फाइल्स हलविण्याचे काम पालिका प्रशासनामार्फत सुरू करण्यात आले आहे. मात्र या फाइल्स स्थलांतरित करण्यासाठी चक्क रुग्णवाहिकेचा वापर केला जात आहे. रुग्णवाहिकेचा असा वापर पालिका प्रशासनामार्फत केला जात असल्याने संतापाची लाट उसळली आहे.
अंबरनाथ नगरपालिकेने नवीन प्रशासकीय इमारत बांधल्यानंतर त्या इमारतीमधून कामकाज देखील सुरू करण्यात आले आहेत मात्र नव्या प्रशासकीय इमारतीमध्ये जागा अपुरी पडत असल्यामुळे काही कार्यालय शहरातील पालिकेच्या इतर इमारतींमध्ये स्थलांतरित केले आहे. अंबरनाथ नगरपालिकेची जुनी प्रशासकीय इमारत पाडण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याने आता या इमारतीमधील महत्त्वपूर्ण फाईल्स सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. जुन्या प्रशासकीय इमारतीमधील फाईल हलवण्यासाठी मंगळवारी वाहनाची गरज होती. मात्र पालिका प्रशासनाला इतर वाहन न मिळाल्याने चक्क ॲम्बुलन्स बोलावून त्या ॲम्बुलन्स मधून सर्व फाईल हलवण्याचे काम सुरू करण्यात आले. फाइल्स हलवण्यासाठी ॲम्बुलन्सचा वापर केल्याने नागरिक देखील चक्रावून गेले होते.