ठाण्याच्या वर्तकनगर दोस्ती विहार संकुलात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2020 11:18 PM2020-10-11T23:18:21+5:302020-10-11T23:22:06+5:30
वर्तकनगर येथील दोस्ती विहार इमारतीच्या संकुलामध्ये आठ जणांवर कुत्र्यांनी हल्ला केल्यामुळे या भागात भीतीचे वातावरण आहे. ठाणे महापालिकेने यावर उपाययोजना करावी, अशी मागणी येथील स्थानिकांनी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कोरोनामुळे गेली सात महिने सुरु असलेल्या टाळेबंदीमध्ये आता शिथिलता आली आहे. मात्र, सार्वजनिक उद्यानात खेळण्यासाठी जाणाऱ्या लहान मुलांच्या अंगावर भटक्या कुत्र्यांकडून हल्ला होण्याच्या प्रकारांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे. विशेषत: वर्तकनगर येथील दोस्ती विहार इमारतीच्या संकुलामध्ये आठ जणांवर कुत्र्यांनी हल्ला केल्यामुळे या भागात भीतीचे वातावरण आहे.
फिरण्यासाठी किंवा खेळण्यासाठी उद्यानात जाणाºया मुलांच्या अंगावर भुंकणे, जेष्ठ नागरिकांच्या मागे लागणे त्याचबरोबर मोटारसायकलस्वाराचा पाठलाग करणे आदी प्रकार ठाण्यातील वर्तकनगर येथील दोस्ती विहार इमारतीच्या संकुलात गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. याबाबत ठाणे महापालिकेकडे तक्र ार करूनही कोणतीच कार्यवाही न झाल्याने रहिवाशांमध्ये नाराजीचा सूर आहे.
ठाणे शहरातील विविध भागात भटक्या कुत्र्यांनी मोठया प्रमाणात उच्छाद घातला आहे. अनेक भागात असलेले कचºयाचे साम्राज्य, चायनीजच्या गाडयांवरील उरलेले अन्न पदार्थ या भटक्या कुत्र्यांना दिले जाते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या टाळेबंदीच्या काळात सार्वजनिक तसेच विविध संकुलातील खासगी उद्यानांमध्येही या भटक्या कुत्र्यांचा वावर मोठया प्रमाणात वाढला होता. इतरत्र त्यांना त्यांचे खाद्यही न मिळाल्याने रस्त्यावरुन जाणाºया नागरिकांच्या अंगावर धावून जाणे, त्यांच्यावर भुंकणे तसेच त्यांचा चावा घेणे असे प्रकार या भटक्या कुत्र्यांकडून सुरु आहेत. भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणासाठी त्यांचे ठाणे महापालिकेकडून निर्बीजीकरणही केले जाते. तरीही ठाण्यातील वर्तकनगर भागातील दोस्ती विहार या संकुलात गेल्या दोन वर्षांतच या भटक्या कुत्र्यांची संख्या मोठया प्रमाणात वाढल्याचे येथील रहिवाशी गिरीश म्हात्रे यांनी सांगितले. गेल्या दोन वर्षात ७० ते ८० रहिवाशांना या कुत्र्यांनी लक्ष केल्याचीही माहिती म्हात्रे यांनी दिली. या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणीही त्यांनी ठाणे महापालिकेकडे पत्राद्वारे केली आहे. मात्र, पालिका प्रशासनाने कोणताच प्रतिसाद दिला नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. येथील रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी पालिकेने यावर उपाययोजना करावी, अशी मागणी येथील स्थानिकांनी केली आहे.