पोखरण स्मशानभूमीविरोधात रस्त्यावर, दुस-या स्मशानाची बळजबरी का? रहिवाशांचा सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 03:16 AM2017-09-19T03:16:30+5:302017-09-19T03:17:05+5:30
पोखरण रोड नं. १ येथील मे. रेप्टोकॉस कंपनीच्या भूखंडावर शिवसेनेच्या एका आमदाराच्या हट्टापायी स्मशानभूमीचा घाट घातला जात आहे. तिचा प्रस्तावदेखील बुधवारच्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे.
ठाणे : पोखरण रोड नं. १ येथील मे. रेप्टोकॉस कंपनीच्या भूखंडावर शिवसेनेच्या एका आमदाराच्या हट्टापायी स्मशानभूमीचा घाट घातला जात आहे. तिचा प्रस्तावदेखील बुधवारच्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे. परंतु भरवस्तीत दुसरी स्मशानभूमी कशासाठी असा सवाल करून येथील रहिवाशांनी पुन्हा रस्त्यांवर उतरुन आंदोलन केले. यावेळी त्यांनी पालिका मुख्यालयात महापौर मीनाक्षी शिंदे यांची भेट घेऊन त्यांना या संदर्भात निवेदन दिले.
येथील साईलिला रहिवाशी सेवा संघाने यासाठी महापालिकेवर सोमवारी मोर्चा काढला. त्यात शेकडो रहिवासी सहभागी झाले होते. पोखरण १ व २ साठी मागील ४० वर्षांपासून उपवन, रामबाग येथे स्मशानभूमी आहे. ती मागील चार वर्षापूर्वी पालिकेने अद्यावत केली आहे. तेथे पूर्वी वनविभागाच्या जागेतून जाण्यासाठी रस्ता होता. परंतु, तो बंद केल्यावर तिला जाण्यासाठी पर्यायी रस्ता देण्यात आला आहे. त्यामुळे रामबाग येथील स्मशानभूमी असतांना दुसरी कशासाठी असा सवाल करून या रहिवाशांनी हा मोर्चा काढला होता.
या स्मशानभूमी संदर्भातील प्रस्तावदेखील बुधवारच्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला असून तो रद्द करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. एक किमीच्या आतच दुसरी स्मशानभूमी कशासाठी असा सवाल करून जर या प्रस्तावाला मंजुरी दिली तर जनआंदोलन उभे केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. दरम्यान, या मोर्चेकर्त्यांनी महापालिकेत महापौर मीनाक्षी शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. महापौरांनीदेखील याबाबत आयुक्तांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले आहे.
स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांनी वेगवेगळ््या १२ ते १४ ठिकाणच्या स्मशानभूमीची मागणी लावून धरली होती. पूर्वी रामबाग स्मशानभूमी उपलब्ध होती. परंतु, वनखात्याने तिकडे जाणारा रस्ता बंद केल्याने अनेक महिन्यांपासून ती बंद आहे. त्यामुळे वागळे इस्टेटच्या स्मशानभूमीचा आधार घ्यावा
लागतो.
या परिसरातील वाढती लोकसंख्या व भविष्यातील गरज लक्षात घेऊन या परिसरातील स्थानिक लोकप्रतिनिधी परिषा सरनाईक, विमल भोईर, कांचन चिंदरकर, पूर्वेश सरनाईक, आशा डोंगरे, जयश्री डेविड, रागिणी बैरीशेट्टी, राधिका फाटक, नरेंद्र सूरकर यांनी सोमवारी पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक, महापौर मीनाक्षी शिंदे व आयुक्त संजीव जयस्वाल यांना निवेदन दिले. पोखरण रोड नं. १ येथील रेप्टाकॉस कंपनीच्या सुविधा भूखंडावर
तसेच टिकुजीनीवाडी परिसरात टीएमटी डेपो शेजारील भूखंडावर आसपासच्या परिसरातील नागरिकांना त्रास होणार नाही अशाप्रकारची प्रदूषणविरहीत स्मशानभूमीची वास्तू बांधण्याची मागणी केली.
प्रदूषणविरहित स्मशानाची मागणी
या स्मशानभूमीच्या बाजूने शिवसेनेच्या परिषा सरनाईक आणि पूर्वेश सरनाईक हे दोघेही उभे राहिले असून तिचा प्रस्ताव मंजूर व्हावा हा हेतू डोळ्यासमोर ठेवून शहरातील सर्वच स्मशानभूमी प्रदूषण विरहित कराव्यात अशी मागणी या दोघांनी पालिकेकडे केली आहे. ंलोकमान्यनगर, शास्त्रीनगर, वर्तकनगर, शिवाईनगर, विजयनगर, भीमनगर, रामबाग, वसंत विहार, पवारनगर, विवेकानंदनगर, कोकणीपाडा, टिकुजीनीवाडी येथे स्मशानभूमीची मागणी सुरू आहे.