"प्रत्येक बुथ आणि मंडल मजबूत करा", रविंद्र चव्हाणांचा भाजप पदाधिकाऱ्यांना कानमंत्र
By अजित मांडके | Published: July 22, 2024 06:01 PM2024-07-22T18:01:44+5:302024-07-22T18:03:15+5:30
विधानसभा निवडणुकीत भाजपसह महायुतीच्या उमेदवारांना ५१ टक्के मते मिळण्यासाठी झटावे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी येथे केले.
ठाणे : कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पक्षाला ७५ टक्के मतदान झाले. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संघटनात्मक ताकदीने हा विजय साकारला. आता लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी प्रत्येक मंडल व बूथ मजबूत करावा. प्रत्येक बूथसाठी प्रवासी योजना तयार करावी. प्रत्येक घरातील नागरिकांपर्यंत संपर्क साधावा. नवमतदारांच्या संख्येत वाढ झाली असून, प्रत्येक मतदाराची नोंदणी करण्यावर भर द्यावा. विधानसभा निवडणुकीत भाजपसह महायुतीच्या उमेदवारांना ५१ टक्के मते मिळण्यासाठी झटावे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी येथे केले.
कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे यांचा विजय व भाजपच्या प्रदेश महाअधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर भाजप ठाणे शहर, ठाणे ग्रामीण, भिवंडी शहर, मिरा-भाईंदर, नवी मुंबई, उल्हासनगर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या स्वतंत्रपणे बैठका घेण्यात आल्या. या बैठकीत भाजपचे नेते व मंत्री रवींद्र चव्हाण बोलत होते. या वेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, माजी मंत्री व आमदार गणेश नाईक, संजय केळकर, निरंजन डावखरे, महेश चौगुले, माजी खासदार संजीव नाईक, ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, ठाणे ग्रामीण अध्यक्ष मधुकर मोहपे, भिवंडी शहर अध्यक्ष हर्षल पाटील, मिरा-भाईंदरचे अध्यक्ष किशोर शर्मा, नवी मुंबईचे अध्यक्ष संदीप नाईक यांच्यासह विविध जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.
आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपसह महायुतीच्या विजयासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी झटून काम करावे. विधानसभा निवडणुकीसाठी अवघ्या साडेतीन महिन्यांचा कालावधी राहिला असून, पक्षकार्यकर्त्यांनी संघटनात्मक दृष्टीने पक्षाला मजबूत करावे, असे आवाहन चव्हाण यांनीकेले. तर महायुतीची राज्यात पुन्हा सत्ता आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी निर्धार करावा, असे आवाहन माजी राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केले.
पुणे येथील भाजप प्रदेश महाअधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांना संदेश दिला आहे. ती भाषणे प्रत्येक कार्यकत्यार्ने पहावी. देशाचे राजकारण पुढे नेण्यासाठी भाजपला महाराष्ट्रात विजय हा आवश्यक आहे. त्यादृष्टीने मरगळ झटकून कार्यकर्त्यांनी कार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. माजी केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनीही मार्गदर्शन केले. प्रत्येकाने पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता असे समजून राज्यात पुन्हा महायुतीच्या विजयासाठी कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.