गीता जैन यांचे हात बळकट करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2019 12:14 AM2019-11-04T00:14:26+5:302019-11-04T00:15:07+5:30
रवींद्र चव्हाण : नगरसेवकांना शहराच्या विकासासाठी एकत्र काम करण्याची सूचना
भार्इंदर : मीरा-भार्इंदर मतदारसंघातून निवडून आलेल्या गीता जैन या भाजपसोबत आहेत. त्या आपल्याच आमदार असल्याने सर्वांनी एकत्र येऊन शहरहिताचे काम करा, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले निर्देश सांगण्यास आलो असल्याचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी भाजप नगरसेवकांच्या बैठकीत सांगितले. चव्हाण यांनी नगरसेवकांशी व्यक्तिगत चर्चा करून म्हणणे ऐकून घेतानाच यापुढे महिन्याच्या चौथ्या शनिवारी भार्इंदरला येऊन आढावा घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी नगरसेवकांचे मोबाइल काढून घेण्यात आले होते.
भाजपच्या बंडखोर गीता जैन यांनी नरेंद्र मेहतांचा पराभव केल्याने मेहता व समर्थकांना धक्का बसला आहे. गीता यांना स्वत: मुख्यमंत्र्यांनीच बोलावून घेतल्यानंतर त्यांनीही भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. गीता यांनीही मीरा-भार्इंदरच्या विकासासाठी भाजपकडून पूर्ण ताकद मिळायला हवी, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली होती. जैन व मेहता यांच्यातील संघर्ष हा आधीपासूनच सुरूहोता. भाजपच्या नगरसेवक असतानाही जैन यांना पक्षाच्या कार्यक्रम, बैठकांपासून लांब ठेवले जात होते. आमदार झाल्यानंतरही त्यांच्याकडे कोणी भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी गेले तरी त्यांना जाब विचारला जात होता. त्यातूनच मीरा-भार्इंदरमधील भाजपमध्ये गटबाजी वा सत्तासंघर्ष निर्माण होण्याची भीती होती, असे सूत्रांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशांनुसार मीरा-भार्इंदरच्या नगरसेवकांची बैठक घेण्यात आली. भार्इंदर पूर्वेच्या गोल्डन नेस्टमधील ब्ल्यू मून क्लबमध्ये रविवारी चव्हाण यांनी नवनिर्वाचित आमदार जैन यांच्यासोबत भाजप नगरसेवकांची बैठक घेतली. बैठकीस ६१ पैकी सुमारे ४६ नगरसेवक तसेच महापौर डिम्पल मेहता, उपमहापौर चंद्रकांत वैती, स्थायी समिती सभापती रवी व्यास, माजी आमदार नरेंद्र मेहता, जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे आदी उपस्थित होते.
यावेळी नगरसेवकांचे मोबाइल काढून घेण्यात आले होते. चव्हाण आदींनी गीता जैन यांचे स्वागत केले.
गीता यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला असून मीरा-भार्इंदरमध्ये आपलाच आमदार आहे. त्यामुळे गीता यांच्यासह सर्वांनी मिळून शहराच्या विकासासाठी एकदिलाने काम करा आणि भाजपला आणखी बळकट करा. जे झाले ते विसरून एकोप्याने कामाला लागा. मुख्यमंत्र्यांनीच हे तुम्हाला सांगण्यासाठी मला पाठवले असल्याचे चव्हाण यांनी बैठकीत सांगितल्याचे सूत्रांनी सांगितले.
नगरसेवकांशी चव्हाण यांनी व्यक्तिश: चर्चा करून त्यांची मते जाणून घेतली. चव्हाण यांनी बैठकीत मुख्यमंत्र्यांचे सांगितलेले निर्देश पाहता जैन या भाजपच्या असल्याचे स्पष्ट करतानाच त्यांना सोबत घेऊन काम करा, असे म्हटल्याने मीरा-भार्इंदर भाजपमधील अनेक नगरसेवक, पदाधिकारी यांनीही कात्रीतून सुटका झाल्याचा आनंद व्यक्त केला आहे. त्याचसोबत गीता यांचे वजन वाढल्याने आता मेहता व त्यांच्या समर्थकांची भूमिका काय राहील, याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.
जैन समर्थकांसह पत्रकारास दमदाटी
निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवाचे पडसाद आज बैठकीदरम्यान पाहायला मिळाले. गीता यांचे समर्थक जितू मेहता यांना माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी शिवीगाळ व धमकी दिली. याप्रकरणी जितू यांनी नवघर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. पोलिसांनी त्यांचा अदखलपात्र गुन्हा नोंदवून घेण्यास नकार दिल्याने तक्रार अर्ज केल्याचे सांगण्यात आले. तर, स्थानिक वृत्तवाहिनीच्या एका पत्रकारास दमबाजीही करण्यात आली. मेहता समर्थकाने एका कॅमेरामनचा कॅमेरा घेऊन धाक दाखवत व्हिडीओ डिलीट करायला लावला. यावेळी पत्रकार व अन्य लोक उपस्थित होते.