ठाणे जिल्ह्यात शिवसेना मजबूत करा, राजेंद्र चौधरी यांचे आवाहन
By सदानंद नाईक | Published: July 15, 2022 04:39 PM2022-07-15T16:39:15+5:302022-07-15T16:40:28+5:30
उल्हासनगरात शिवसेनेचा कार्यकर्ता निर्धार मेळावा
- सदानंद नाईक
उल्हासनगर : कॅम्प नं-४ येथील स्वामी शांतीप्रकाश हॉल मध्ये गुरवारी रात्री शिवसेना कार्यकर्ता निर्धार मेळावा संपन्न झाला. नगरसेवक कुठेही जात असलेतरी शिवसैनिक, पदाधिकारी शिवसेने सोबत असून पुन्हा एकदा ठाणे जिल्हा उद्धव ठाकरे यांच्या मागे असल्याचे दाखवून द्या, असे आवाहन शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी केले.
उल्हासनगरातील शिवसैनिक व पदाधिकारी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत दाखविण्यासाठी गुरवारी शिवसेना कार्यकर्ता निर्धार मेळाव्याचे आयोजन शिवसैनिकांनी केले होते. कॅम्प नं-४ स्वामी शांतीप्रकाश हॉल मध्ये आयोजित केलेल्या निर्धार मेळाव्याला जिल्हा संपर्कप्रमुख सुभाष भोईर, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, शहराचे पाहिले शहरप्रमुख रमेश मुकणे, उपशहरप्रमुख राजेंद्र शाहू, संदीप गायकवाड, दिलीप गायकवाड, महिला आघाडी प्रमुख मनीषा भानुशाली यांच्यासह पक्षाचे नगरसेवक, विभागप्रमुख, शाखाप्रमुख व शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी निर्धार मेळाव्या निमित्त शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन केल्याचे बोलले जात असून मेळाव्याला शिवसैनिक व महिलां पदाधिकार्यांनी एकच गर्दी केली होती. मेळाव्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
शहरातील शिवसेनेचे नगरसेवक कुठेही गेलेतरी, पक्षाला बळ देणारे शिवसैनिक, पदाधिकारी शिवसेने सोबत आहेत. त्यामुळे पक्षाला चिंता करण्याची गरज नसल्याचे मत यावेळी शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी मार्गदर्शन वेळी व्यक्त केले. तसेच शहरासह ठाणे जिल्हा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत असल्याचे दाखवून द्यायचे आहे. त्यामुळे शिवसैनिक व पदाधिकार्यांनी पक्ष कामाला लागा. असे आवाहन चौधरी यांनी केले. संपर्कप्रमुख सुभाष भोईर, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, धनंजय बोडारे, माजी विरोधीपक्ष नेते दिलीप मालवणकर आदींनी मेळाव्याला मार्गदर्शन केले. निर्धार मेळाव्याला शिवसेनेच्या बहुतांश नगरसेवकांनी हजेरी लावल्याची माहिती चौधरी यांनी देऊन शहरात पक्षाला नंबर वन बनविणारच, असे सांगितले.