दंगलीनंतर मोखाड्यात तणावपूर्ण शांतता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 03:22 AM2018-06-11T03:22:02+5:302018-06-11T03:22:02+5:30
मोखाडा - येथील मुस्लिम समाजातील दोन गटांमध्ये शुक्र वारी उसळलेल्या दंगली प्रकरणी दोन्ही गटांवर परस्परविरोधी, दंगल घडविल्याचा आरोप ठेवून मोखाडा पोलिसांनी ८५ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
मोखाडा - येथील मुस्लिम समाजातील दोन गटांमध्ये शुक्र वारी उसळलेल्या दंगली प्रकरणी दोन्ही गटांवर परस्परविरोधी, दंगल घडविल्याचा आरोप ठेवून मोखाडा पोलिसांनी ८५ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. पैकी ४२ जणांना ताब्यात घेतले असून त्यांना जव्हारच्या प्रथम वर्ग न्यायालयाने १२ जुन पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
मोखाड्यातील खाटीक आणि मनियार, शेख या मुस्लिम समाजातील दोन गटांत पुर्व वैमनस्यातुन शुक्र वारी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान दंगल उसळली होती. या दंगलीत दगड , विटा, सोडावाटरच्या बाटल्यांचा मारा करण्यात आला होता. तसेच नंग्या तलवारी ही सर्रास नाचविण्यात आल्या होत्या. या दंगलीत दोन्ही गटातील सात ते आठ जणं जखमी झाले आहेत. ही दंगल घडवून आणल्या प्रकरणी मोखाडा पोलिसांनी ८५ जणांवर दंगल घडविल्या चा गुन्हा दाखल केला आहे. मात्र, यामधील ३६ जणांनासह ६ अल्पवयीन तरुणांना मोखाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांना जव्हार येथील प्रथम वर्ग न्यायालयाने १२ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेनंतर मोखाड्यात तणावपूर्ण शांतता आहे.
मोखाड्यात प्रथमच आणि रमजान महिन्यात अशी घटना घडल्याने मुस्लिम मोहल्ल्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बंदोबस्त चोख असून या घटनेचा तपास मोखाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश सोनवणे करत आहेत.
रॅपिड अॅक्शन फोर्स तैनात
- रमजान महिना असल्याने, मुस्लिम समाजाला शांततेत नमाज अदा करता यावी म्हणून प्रशासनाने सर्वांना आवाहन केले आहे.
- मशीदी सह मुस्लिम मोहल्ल्यात शीघ्र कृती दल आणि दंगल विरोधी पथकाच्या तुकड्यांसह पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.