कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर धडक कारवाई; पोलिसांनासोबत घेऊन करणार कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 07:04 PM2021-06-29T19:04:34+5:302021-06-29T19:07:21+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates : डेल्टा प्लस व्हेरिएंट आणि शहरात निर्बंधाचा तिसरा स्तर लागू असल्याची काटेकोर अंमलबजावणी होण्याच्या अनुषंगाने महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी वैद्यकीय अधिकारी, प्रभाग अधिकाऱ्यांशी संवाद साधला होता.
मीरारोड - कोरोनाचा घातक असा डेल्टा प्लस व्हेरिएंट आणि तिसऱ्या लाटेचा धोका पाहता मीरा भाईंदर महापालिकेने शहरात कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर धडक कारवाई महापालिका व पोलिसांच्या वतीने सुरू करण्यात आल्याने नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची गय करणार नाही असा इशारा महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी दिला आहे. सोमवारी पालिकेने २ दुकानांना सील ठोकत ३९ हजारांचा दंड सोमवारी वसूल केला.
डेल्टा प्लस व्हेरिएंट आणि शहरात निर्बंधाचा तिसरा स्तर लागू असल्याची काटेकोर अंमलबजावणी होण्याच्या अनुषंगाने महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी वैद्यकीय अधिकारी, प्रभाग अधिकाऱ्यांशी संवाद साधला होता. सदर चर्चेत अतिरिक्त आयुक्त विजयकुमार म्हसाळ, उपायुक्त मारुती गायकवाड, संजय शिंदे व डॉ. संभाजी पानपट्टे, प्रभारी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश जाधव आदी उपस्थित होते.
कोरोनाची तिसरी लाट जास्त धोकादायक ठरणार असून निर्बंधांची प्रभावी अंमलबजावणी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर निर्बंधच्या कोणत्याही नियमांचे उल्लंघन शहरात होणार नाही यासाठी प्रभाग अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. त्याअनुषंगाने प्रभागनिहाय प्रभाग अधिकाऱ्यांमार्फत सोमवारी सायंकाळ पासून रात्रीपर्यंत कारवाई केली गेली. प्रभाग समिती क्रमांक ०५ मध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २ दुकानांना सील ठोकण्यात आले. एकुण ७ दुकानांवर दंडात्मक कारवाई करून रू.१४ हजार दंड वसूल करण्यात आला व २० हातगाड्या तोडण्यात आल्या.
प्रभाग कार्यालय क्रमांक १ भाईंदर (पश्चिम) मध्ये मॅक्सस मॉल मागे शक्ति डोसा दुकानावर दंडात्मक कारवाई करत २५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. उपायुक्त अजित मुठे, प्रभाग अधिकारी हंसराज मेश्राम, अतिक्रमण विभाग प्रमुख नरेंद्र चव्हाण, कनिष्ठ अभियंता जटाळकर, योगेश भोईर, प्रभाग कर्मचारी कांबळे, माने व सुरक्षारक्षक यांचे मार्फत ही कारवाई करण्यात आली.