अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना रहिवाशांनी विरोध केल्यास कठोर कारवाई होणार
By जितेंद्र कालेकर | Published: April 29, 2020 01:27 AM2020-04-29T01:27:34+5:302020-04-29T01:32:37+5:30
पोलीस दल, आरोग्यसेवक, डॉक्टर, पालिका अधिकारी आणि अत्यावश्यक सेवेतील देवदूतांना नागरिकांनीही सहकार्य करणे आवश्यक आहे. अत्यावश्यक सेवेतील लोकांना काही गृहसंकुलांमध्ये नागरिकांचा विरोध होत आहे. असा विरोध किंवा हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचा इशारा ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: अत्यावश्यक सेवेतील अथवा वैद्यकीय सेवेतील कर्मचाºयांना कोणीही विरोध किंवा हल्ला केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिला आहे. लॉकडाऊनच्या महिनाभरातील काळात ठाणेकरांनी केलेल्या सहकार्याबद्दलही त्यांनी मनापासून आभार व्यक्त केले आहेत.
सोशल मिडियाच्या माध्यमातून पोलीस आयुक्त फणसळकर यांनी केलेल्या आवाहनामध्ये म्हटले आहे की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात लागू असलेल्या संचारबंदीच्या काळात ठाणेकर जनतेने पोलीस आणि प्रशासनाला अभूतपूर्व सहकार्य केले आहे. अतिशय धैर्य दाखवून काळजी घेत बहुतांश नागरिक हे घरातच थांबले आहेत. परंतू, त्यातही काहीजण अनावश्यकपणे घराबाहेर पडतांना निदर्शनास येते. काहीजण नाहक गर्दीही करतात. त्यामुळे अशा बेजबाबदार लोकांवर कारवाई करावी लागली. त्यांची वाहनेही मोठया प्रमाणात जप्त केली आहेत. अजूनही कोरोनाच्या रुग्णांची संख्या घटलेली किंवा स्थिरावलेली नाही. विशेषत: ठाणे शहर, भिवंडी आणि कल्याण डोंबिवली क्षेत्रात कोरोनाचे रुग्ण वाढताहेत, ही चिंतेची बाब आहे. त्यामुळेच संचारबंदीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. पोलीस दल, आरोग्यसेवक, डॉक्टर, पालिका अधिकारी आणि अत्यावश्यक सेवा चालू ठेवण्यासाठी शासनाचे विभाग कठोर परिश्रम घेत आहेत. पोलीसही रात्रंदिवस तैनात आहेत. अशा देवदूतांना नागरिकांनीही सहकार्य करणे आवश्यक आहे. मात्र, काही ठिकाणी अशा अत्यावश्यक सेवेतील लोकांना काही गृहसंकुलांमध्ये मात्र नागरिकांचा विरोध होत आहे. शिवाय, एका डॉक्टरला मारहाणीचा प्रकारही भार्इंदर पाडा येथे दोन दिवसांपूर्वी घडला. मुळात, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ते काम करीत आहेत. त्यांना विरोध करणे हे अनैतिकच नव्हे तर बेकायदेशीर आहे. अशा लोकांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा फणसळकर यांनी दिला आहे. सध्या रमजानच्या काळात मुस्लिम बांधवांनी घरातूनच नमाज अदा करावी, असेही आवाहन त्यांनी केले आहे. सर्वांनी संघटीतपणे कोरोनावर मात करु असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. पोलीस तुमच्यासाठी रस्त्यावर आहेत. तुम्ही पोलिसांसाठी घरीच रहा, असे आवाहनही त्यांनी केले.