करवसुली न झाल्यास होणार कठोर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 11:58 PM2020-12-15T23:58:25+5:302020-12-15T23:58:34+5:30
नवीन मालमत्तांसाठी सर्वेक्षणाचे आदेश; उत्पन्नवाढीसाठी निर्णय
ठाणे : मालमत्ता आणि पाणीपुरवठा कराची वसुली उद्दिष्टानुसार न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत देतानाच, महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी नवीन मालमत्तांचा शोध घेण्यासाठी प्रभाग समिती स्तरावर सर्वेक्षण करण्याचे आदेश सर्व प्रभाग अधिकाऱ्यांना मंगळवारी दिले. नवीन मालमत्तांचा शोध घेऊन त्यांना कर आकारणी करून उत्पन्न वाढीसाठी आयुक्तांनी हा निर्णय घेतला आहे.
मनपा क्षेत्रात मालमत्ता व पाणीपुरवठा करवसुली मोहीम सुरू असून, शर्मा यांनी ठाणे महापालिकेच्या नागरी संशोधन केंद्र येथे विभाग प्रमुखांची बैठक घेऊन करवसुलीचा आढावा घेतला. यावेळी अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे हे उपस्थित होते. महानगरपालिकेच्या वतीने सन २०२०-२१ या आर्थिक वर्षातील मालमत्ता कर आणि पाणी देयकांची, तसेच मागील थकबाकी वसुलीकरिता मोठ्या प्रमाणात मोहीम राबविण्यात येत आहे. १०० टक्के वसुलीकरिता प्रभाग समितीनिहाय दैनंदिन उद्दिष्टे देण्यात आली आहेत. दिलेल्या उद्दिष्टानुसार मालमत्ता आणि पाणीपुरवठा कराची वसुली न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत डॉ.शर्मा यांनी दिले आहेत. प्रभाग समितीनिहाय देण्यात आलेले दैनंदिन उद्दिष्टे १०० टक्के पूर्ण करून, वसुलीचा दैनिक आढावा सादर करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
थकबाकीदारांचा पाणीपुरवठा करणार बंद
महापालिका क्षेत्रातील नवीन मालमत्तांचा शोध घेण्यासाठी प्रभाग समिती स्तरावर सर्वेक्षण करण्याचे आदेश सर्व सहायक आयुक्तांना देण्यात आले असून, नवीन मालमत्तांना कर आकारणी करून उत्पन्नवाढीसाठी आयुक्तांनी हा निर्णय घेतला आहे. जे थकबाकीदार पाणीपुरवठा कर भरणार नाहीत, त्यांची नळ संयोजने खंडित करून पाणीपुरवठा बंद करण्यासोबतच जप्तीची कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.