शिवसेनेच्या दबावामुळे बदलापूरमधील कडकडीत लॉकडाऊन रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:43 AM2021-05-11T04:43:02+5:302021-05-11T04:43:02+5:30
बदलापूर: बदलापूर शहरात शनिवारपासून लागू करण्यात आलेला कडकडीत लॉकडाऊन अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केला. राज्यातील सत्ताधारी शिवसेनेने बदलापूरमधील लॉकडाऊनला कडाडून ...
बदलापूर: बदलापूर शहरात शनिवारपासून लागू करण्यात आलेला कडकडीत लॉकडाऊन अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केला. राज्यातील सत्ताधारी शिवसेनेने बदलापूरमधील लॉकडाऊनला कडाडून विरोध केला होता. राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे शहरात आता लॉकडाऊन राहणार असल्याने मंगळवारपासून व्यापारी सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत नियमित व्यवसाय करू शकतील.
बदलापूर शहरातील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी बदलापूर पालिकेने तडकाफडकी निर्णय घेत शनिवारपासून लॉकडाऊन जाहीर केला होता. त्याला जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली होती. मेडिकल स्टोअर आणि रुग्णालयेवगळता सर्व आस्थापना बंद करण्यात आली होती. या लॉकडाऊनवरून शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपली होती. शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी या लॉकडाऊनला विरोध दर्शविला होता. पूर्वतयारी न करता लागू केलेला लॉकडाऊन रद्द करण्याची मागणी म्हात्रे यांनी पालकमंत्र्यांकडे केली होती. त्यानुसार पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकार्यांना आदेश देऊन लॉकडाऊन रद्द करण्याचे निर्देश दिले. सोमवारी रात्री जिल्हाधिकाऱ्यांनी नवीन आदेश काढत कडकडीत लॉकडाउन रद्द केला. भाजपचे आमदार किसन कथोरे यांनी कडक लॉकडाऊन लावावा, अशी मागणी केली होती.
.........
वाचली