बदलापूरमध्ये कडक लॉकडाऊनला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:41 AM2021-05-09T04:41:41+5:302021-05-09T04:41:41+5:30
बदलापूर : राज्य सरकारने लागू केलेला लॉकडाऊन अधिक कडक करण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर बदलापूर पालिकेने घेतला आहे. पालिकेच्या या ...
बदलापूर : राज्य सरकारने लागू केलेला लॉकडाऊन अधिक कडक करण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर बदलापूर पालिकेने घेतला आहे. पालिकेच्या या निर्णयाला जिल्हाधिकाऱ्यांनीही शुक्रवारी रात्री उशिरा मंजुरी दिली. आमदारांसोबत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत मेडिकल स्टोअर, बँक आणि रुग्णालय सेवा वगळता सर्व अत्यावश्यक सेवा या आठवडाभर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी शनिवारपासून सुरू झाली.
एकीकडे राज्य सरकार नागरिकांना कमीत कमी त्रास होईल त्या अनुषंगाने लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणत नवनवीन प्रयोग करीत आहे, तर दुसरीकडे बदलापुरातून कोरोना हद्दपार करण्याच्या उद्देशाने पालिका प्रशासनाने शहरात कडक लॉकडाऊन करण्याच्या अनुषंगाने प्रयत्न सुरू केले आहेत. शनिवारपासून पुढील सात दिवस शहरात कडक लॉकडाऊन असेल. नागरिकांना घरातच राहण्याचा सल्ला प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.
बदलापूर शहरात लॉकडाऊन लागावा यासाठी आमदार किसन कथोरे यांनी पालिका सभागृहात सर्वपक्षीय सदस्यांची बैठक घेतली होती. या बैठकीत लॉकडाऊन संदर्भातील निर्णय घेऊन प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला होता. या निर्णयाला जिल्हाधिकार्यांनीही समर्थन दर्शवीत बदलापुरात कडक लॉकडाऊन जाहीर केला. लॉकडाऊनसाठी कथोरे यांनी पुढाकार घेतल्याने इतर पक्षांनी मात्र आता या कडक लॉकडाऊनला विरोध करण्यास सुरुवात केली आहे.
-------------------------------------------------
नागरिकांचे होतील हाल - म्हात्रे
कडक लॉकडाऊनमुळे नागरिकांचे हाल होणार असल्याचे मत शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी व्यक्त केले आहे. हे लॉकडाऊन रद्द करावे, या मागणीसाठी म्हात्रे यांनी शनिवारी पालिका सभागृहात ठाण मांडून आपला निषेध व्यक्त केला, तर पोलिसांनी लॉकडाऊनच्या अंमलबजावणीला सुरुवात केली आहे.