बेकायदा बांधकामांना कारवाईचा तडाखा
By admin | Published: March 17, 2017 06:06 AM2017-03-17T06:06:36+5:302017-03-17T06:06:36+5:30
शहरातील पाणीसमस्येबरोबरच रस्ते, गटारे, आरोग्य, साफसफाई, डम्पिंगच्या प्रश्नांना प्राधान्य देणार आहे. शहराला शाप असलेल्या बेकायदा बांधकामांकडे विशेष लक्ष दे
उल्हासनगर : शहरातील पाणीसमस्येबरोबरच रस्ते, गटारे, आरोग्य, साफसफाई, डम्पिंगच्या प्रश्नांना प्राधान्य देणार आहे. शहराला शाप असलेल्या बेकायदा बांधकामांकडे विशेष लक्ष देणार असल्याची माहिती नवनियुक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिली.
मावळते आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्याकडून गुरुवारी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर, त्यांनी प्रभाग समिती कार्यालयाला भेट देऊन अधिकाऱ्यांची बैठक घेतली. निंबाळकर यांनी अपुरी राहिलेली कामे अवघ्या अर्ध्या तासात पूर्ण केली. डॉ. शिंदे यांच्याकडे पदभार देताच निंबाळकर यांनी पालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांचा निरोप घेत पनवेल महापालिकेचा आयुक्तपदाचा पदभार घेण्यासाठी रवाना झाले.
डॉ. शिंदे यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. शहरातील प्रश्न जाणून घेतले. दुपारी प्रभाग अधिकारी, बीट निरीक्षक, पाणीपुरवठा अधिकारी, बांधकाम विभाग, मालमत्ताकर आदी विभागांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांशी चर्चा करून आढावा घेतला.
शहरातील अर्धवट व ठप्प पडलेल्या विकासकामांना प्रथम प्राधान्य देणार असल्याचे ते म्हणाले. पाणीसमस्येवर उपाययोजना करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. शहर विकासासाठी निधी कमी पडू नये, म्हणून मालमत्ताकर विभागाच्या वसुलीला प्राधान्य देणार
असल्याचे डॉ. शिंदे यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)