कर वसुलीसाठी ग्रामपंचायतीकडून धडक कारवाई; दोन दिवसात १८ लाखांची वसुली
By नितीन पंडित | Published: January 5, 2023 04:50 PM2023-01-05T16:50:00+5:302023-01-05T16:50:45+5:30
सोनाळे ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक गोदाम मालमत्ता असून या मालमत्ता कराची रक्कम कोट्यवधी रुपयांच्या घरात जात आहे.
नितीन पंडित
भिवंडी: दि.५- तालुक्यातील सोनाळा ग्रामपंचायत हद्दीतील मालमत्ता कराची थकीत वसुली करण्यासाठी सरपंच मनीषा तानाजी मोरे यांनी उपसरपंच संजय थळे, ग्रामविकास अधिकारी आशिष चव्हाण सर्व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी यांनी थकीत मालमत्ता कर धारकांवर वसुलीसाठी जप्ती कारवाईस सुरुवात केलेली आहे.या कारवाईचा धसका घेऊन मागील दोन दिवसात १८ लाख रुपयांची थकीत कराची वसुली करण्यात ग्रामपंचायत यशस्वी ठरली आहे.
सोनाळे ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक गोदाम मालमत्ता असून या मालमत्ता कराची रक्कम कोट्यवधी रुपयांच्या घरात जात आहे. सध्या या ग्रामपंचायतीची १ कोटी ३२ लाख रुपयांची मालमत्ता कर थकीत आहे.थकीत कराची वसूली होत नसल्यामुळे त्याचा परिणाम ग्रामपंचायतीच्या विकास कामांवर होऊन ती कामे ठप्प होत आहेत.ही बाब गांभीर्याने घेत सरपंच मनीषा तानाजी मोरे, यांनी सर्व ग्रामपंचयाय लोकप्रतिनिधी, कर्मचारी यांना विश्वासात घेत मागील दोन दिवसांपासून मालमत्ता कर वसुलीसाठी धडक मोहीम सुरू केली आहे.
ग्रामपंचायत प्रशासनाने सुरू केलेल्या या कारवाईचा धसका घेऊन मागील दोन दिवसात १८ लाख रुपयांची थकीत कराची वसुली करण्यात ग्रामपंचायत यशस्वी झाली आहे.सोनाळे ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणावर अनधिकृत मालमत्ता असून त्या मालमत्तांना अजूनही मालमत्ता कर आकारणी केलेली नसल्याने अशा मालमत्तांचा शोध घेऊन त्यांना लवकरात लवकर दंडासह मालमत्ता कर आकारणी करून ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढ केली जाईल अशी माहिती सरपंच मनीषा तानाजी मोरे यांनी दिली आहे.