ठेकेदारावरील हल्ला प्रकरणी उल्हासनगरात ठेकेदाराने कामबंद आंदोलन
By सदानंद नाईक | Published: April 20, 2024 06:21 PM2024-04-20T18:21:13+5:302024-04-20T18:21:49+5:30
उल्हासनगर कॅम्प नं-४, कुर्ला कॅम्प येथील सेंट्रल पार्क हॉटेल समोरील रस्त्याच्या पुनर्बांधणीचे काम पी अँड झा नावाच्या कंपनीने घेतले आहे.
सदानंद नाईक
उल्हासनगर : महापालिका ठेकेदारावरील हल्लेखोरावर सक्त कारवाईचे निवेदन महापालिका कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन संघटनेने पोलीस उपायुक्त सुधाकर पाठारे यांना शनिवारी देवून सक्त कारवाईची मागणी केली. विठ्ठलवाडी पोलिस याप्रकरणी तपास करीत असून हल्लेखोर टोळक्या पैकी एकाला अटक केली आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-४, कुर्ला कॅम्प येथील सेंट्रल पार्क हॉटेल समोरील रस्त्याच्या पुनर्बांधणीचे काम पी अँड झा नावाच्या कंपनीने घेतले आहे. बुधवारी सायंकाळी ५ वाजता रस्त्याची पाहणी साठी गेलेले पी अँड झा कंपनीचे रिप्रेझेंटीव्ही विशाल माखिजा यांच्या सोबत एका टोळक्याने, वाद घातल्यावर त्यांच्यात तू तू मैं झाली. तेंव्हा टोळक्याने माखीजा यांच्यावर हल्ला करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
हल्ल्याला ४ दिवस उलटून गेल्यावरही, पोलिसांनी फक्त एकाला अटक केली. या निषेधार्थ महापालिका कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन या संघटनेने पोलीस उपायुक्त सुधाकर पाठारे यांची शनिवारी भेट घेऊन हल्लेखोरांना अटक करण्याची मागणी केली. तसेच समाधानकारक कारवाई होत नाही. तोपर्यंत कामबंद आंदोलनाची हाक त्यांनी दिली. शहरातील विकास कामाच्या ठिकाणी ठेकेदारावर संरक्षण देण्याची वेळ आल्याचे यावेळी ठेकेदारांनी बोलून दाखविले. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी याप्रकरणी तपास सुरू असून दोषी इतरांवर कारवाईचे संकेत दिले.