व्यवस्थापकाची कर्मचाऱ्यास मारहाण
By admin | Published: February 21, 2017 05:54 AM2017-02-21T05:54:15+5:302017-02-21T05:54:15+5:30
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या मालमत्ताकराचे सर्वेक्षण करणाऱ्या कंत्राटदार कंपनीकडे दोन महिने पगाराची
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या मालमत्ताकराचे सर्वेक्षण करणाऱ्या कंत्राटदार कंपनीकडे दोन महिने पगाराची मागणी करणाऱ्या एका कामगाराला मारहाण करण्यात आल्याची घटना रविवारी रात्री घडली होती. या प्रकरणी ५० ते ६० कामगारांनी सोमवारी येथील सहायक कामगार आयुक्त कार्यालयात धाव घेत मारहाण केलेल्या कामगारास न्याय मिळवून देण्याची मागणी केली.
केडीएमसी हद्दीतील मालमत्तांचे सर्वेक्षण करण्याचे कंत्राट नागपूरच्या कोलब्रो ग्रुप या कंपनीला देण्यात आले आहे. भंडारा येथील भूषण रामटेके या कंपनीत सर्व्हेअर म्हणून काम करत होते. मात्र, त्यांना कामावरून कमी केले आहे. रामटेके यांनी रविवारी रात्री कंपनीचे व्यवस्थापक सन्नी अनिस यांना भानुसागर टॉकीजजवळ भेटून त्यांच्याकडे दोन महिन्यांचा पगार मागितला. त्यामुळे सन्नी यांनी त्यांना मारहाण केली. याप्रकरणी रामटेके यांनी महात्मा फुले चौक पोलीस ठाणे गाठले. त्यानुसार, अदखलपात्र गुन्हाही दाखल झाला आहे.
दरम्यान, सोमवारी दुपारी रामटेके व काही कामगारांनी सहायक कामगार आयुक्त कार्यालयात धाव घेतली. या कामगारांनी तेथील अधिकारी भोईर यांची भेट घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली. यासंदर्भात निवेदनही देण्यात आले. (प्रतिनिधी)