विद्यापीठाच्या कल्याण उपकेंद्राच्या हेतूलाच हरताळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2019 12:20 AM2019-08-09T00:20:41+5:302019-08-09T00:20:51+5:30
अभाविपने वेधले लक्ष : शैैक्षणिक कागदपत्रे मिळण्याची सुविधा नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय
- जान्हवी मोर्ये
डोंबिवली : जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना त्यांची शैक्षणिक कागदपत्रे व कामासाठी मुंबईतील विद्यापीठात जावे लागू नये, यासाठी विद्यापीठाचे कल्याण येथे उपकेंद्र स्थापन करण्यात आले आहे. मात्र, या केंद्राच्या उद्घाटनानंतरही येथे विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कागदपत्रे मिळण्याची सोय अद्याप करण्यात आली नाही. त्यामुळे उपकेंद्राच्या मुख्य उद्देशालाच हरताळ फासला गेला आहे, याकडे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने लक्ष वेधले आहे.
विद्यापीठ उपकेंद्राचा शुभारंभ ११ जुलैला युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाला. ‘स्कूल आॅफ इंजिनीअरिंग अॅण्ड अप्लाइड सायन्सेस’ या अभ्यास शाखेची सुरुवात येथे केली जाणार आहे. या उपकेंद्रात एम.टेक इन कॉम्प्युटर इंजिनीअरिंग, एम.टेक इन केमिकल इंजिनीअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी, एम.टेक इन ट्रान्सपोर्टेशन इंजिनीअरिंग, एम.टेक इन आर्टिफि शिअल इंटेलिजन्स अॅण्ड मशीन लर्निंग, मास्टर इन ओशोनोग्राफी, पीएच.डी. इन कॉम्प्युटर इंजिनीअरिंग, पीएच.डी. इन केमिकल सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी हे अभ्यासक्रम या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे कागदपत्रे मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना पुन्हा मुंबईलाच धाव घ्यावी लागणार आहे, याकडे विद्यार्थी परिषदेने लक्ष वेधले आहे. विद्यापीठ उपकेंद्र सुरू करण्यासाठी आधीच विलंब झाला आहे. मात्र, तरीही उपकेंद्रातून खरा उद्देश साध्य होणार नाही, यासाठी विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी शुभारंभाच्या कार्यक्रमात निषेधाच्या घोषणा देत कुलगुरूंसह प्रशासनाचा निषेध व्यक्त केला होता.
विद्यार्थी परिषदेतर्फे विद्यापीठाच्या कल्याण येथील उपकेंद्राची कार्यशीलता वाढवणे, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, जेणेकरून ठाणे-पालघर जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांना त्यांची शैक्षणिक कागदपत्रे व कामासाठी मुंबईत वारंवार जावे लागणार नाही, यासाठी दक्षता घेतली जाणार आहे.
महाविद्यालयात तक्रार निवारण केंद्र आणि हेल्पलाइनची सुविधा व्हावी, यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) २०१५ मध्ये सुचवलेली ‘चॉइस बेस क्रेडिट सिस्टीम’ परिणामकारकरीत्या विद्यापीठात लागू करावी, यासाठी आगामी काळात प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती अभाविपचे डोंबिवलीतील कार्यकर्ते मिहीर देसाई यांनी दिली.
लवकरच सेवा उपलब्ध करून देऊ - विद्यापीठ
विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवा पुरविण्याच्या सक्षमीकरणाचे काम विद्यापीठाने केले आहे. विद्यार्थ्यांना हॉल तिकीट देणे, प्रवेश अर्ज उपलब्ध करून देणे हे काम आॅनलाइनद्वारे केले जाते. निकाल महाविद्यालयांना पाठविले जातात. या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना जे काही गरज लागेल ते लवकरात लवकर मिळेल असे पाहू. ठाण्यात ही सेवा उपलब्ध आहे. कल्याणला ही लवकरच सेवा उपलब्ध करून देऊ, अशी माहिती उपकुलसचिव व विद्यापीठ जनसंपर्क अधिकारी डॉ. लीलाधर बनसोड यांनी दिली.