उल्हासनगरात कचरा उचलणाऱ्या कामगारांचे कामबंद आंदोलन, पालिकेकडून कंत्राटदाराला नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 12:38 AM2020-12-12T00:38:44+5:302020-12-12T00:39:08+5:30
उल्हासनगर शहरातील कचरा उचलणाऱ्या कामगारांनी पगार झाला नसल्याच्या निषेधार्थ शुक्रवारपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे.
उल्हासनगर : शहरातील कचरा उचलणाऱ्या कामगारांनी पगार झाला नसल्याच्या निषेधार्थ शुक्रवारपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. महापालिकेने कचऱ्याचे ढीग साचू नये, म्हणून खासगी जेसीबी व डम्परच्या मदतीने कचरा उचलत आहे. दरम्यान, कोनार्क कंपनीला नोटीस दिल्याची माहिती मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणी यांनी दिली.
उल्हासनगर महापालिकेने शहरातील कचरा उचलण्याचे कंत्राट कोनार्क कंपनीला दिले आहे. कचरा उचलण्यावर दिवसाला चार लाख ४६ हजार, महिन्याला १ कोटी ३४ लाख रुपये व वर्षाला १५ कोटीपेक्षा जास्त खर्च महापालिका करते. कोरोना काळात महापालिकेची आर्थिक स्थिती डबघाईला आल्याने कंत्राटदाराला गेल्या तीन महिन्यांपासून पैसे दिले नाही. हे कारण पुढे करून कचरा उचलणाऱ्या ५५०पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचे वेतन दिलेले नाही. कामगारांचा ४ डिसेंबर रोजी पगार झाला नसल्याने त्यांच्यात असंतोष निर्माण झाला.
कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या लढा कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप गायकवाड यांनी वेतन नाही, तोपर्यंत कामबंद अशी भूमिका घेतल्याने शुक्रवारपासून कामबंद आंदोलन केले. कामगारांच्या आंदोलनाने शहरात कचऱ्याचे ढीग साचू नयेत, म्हणून महापालिकेच्या आरोग्य विभागाने तीन जेसीबी मशीन, ८ डम्पर कचरा उचलण्यासाठी लावले आहेत. दरम्यान, सोमवारपर्यंत कंत्राटदाराला पैसे देण्याचे संकेत महापालिका प्रशासनाने दिल्याने आंदोलन मागे घेण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
शहरात ठिकठिकाणी साचले कचऱ्याचे ढीग
कामगारांच्या कामबंद आंदोलनामुळे घरोघरी जाऊन कचरा उचलला गेला नाही, तसेच अनेक ठिकाणी कचराकुंड्या ओव्हरफ्लो झाल्या असून, सर्वत्र कचरा व अस्वच्छतेचे चित्र होते. नागरिकांनी पालिकेच्या कारभाराविराेधात संताप व्यक्त केला आहे.