मीरा-भाईंदरमध्ये पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांना दणका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2020 07:26 AM2020-03-22T07:26:56+5:302020-03-22T07:27:07+5:30
मीरा-भाईंदरमधील ६ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दुकाने सुरू ठेवणे आदी प्रकारे उल्लंघन करणाऱ्या लोकांविरोधात शुक्रवारपासून तब्बल ७९ गुन्हे दाखल केले गेले असून, नवीन गुन्हे दाखल करण्याचा सपाटा पोलिसांनी लावला आहे.
मीरा रोड - कोरोनाचा वाढता धोका टाळण्यासाठी शासनासह पालिकेने केलेल्या उपाययोजना व आदेशांना धुडकावणाऱ्यांविरोधात ठाणे ग्रामीण पोलीसांनी धडक गुन्हे दाखल करण्याची मोहीमच सुरू केली आहे. मीरा-भाईंदरमधील ६ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दुकाने सुरू ठेवणे आदी प्रकारे उल्लंघन करणाऱ्या लोकांविरोधात शुक्रवारपासून तब्बल ७९ गुन्हे दाखल केले गेले असून, नवीन गुन्हे दाखल करण्याचा सपाटा पोलिसांनी लावला आहे. त्यामुळे दुकाने-व्यवसाय सुरू ठेवणाऱ्यांसह सोशल मीडियावर खोट्या अफवा पसरवणाऱ्या अपप्रवृत्तींचे धाबे दणाणले अहेत.
शासनासह मीरा-भाईंदर महापालिकेने देखील शहरातील जिवनावश्यक तसेच वैद्यकिय सेवा वगळता बाकी सर्व आस्थापना, दुकाने, व्यवसाय, फेरीवाले यांना ३१ मार्च पर्यंत बंदी घातलेली असताना देखील कोरोनाच्या आपत्तीचे गांभीर्य न राखता त्याचे उल्लंघन करुन काहींनी बार, दुकाने- व्यवसाय सुरु ठेवले. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, माहाराष्ट्र कोवीड - १९ उपाय योजना नियम तसेच भादविसच्या कलम १८८ नुसार पोलीसांनी अशा दुकाने - आस्थापनां विरुध्द गुन्हे दाखल करण्याचा धडाका लावला आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी पाटील, अपर अधीक्षक संजयकुमार पाटील यांच्या मार्गदर्शना खाली भार्इंदर उपअधीक्षक डॉ शशिकांत भोसले , मीरारोड उपअधीक्षक शांताराम वळवी सह पोलीस ठाणे प्रभारींनी गुन्हे दाखल करण्याची धडक कारवाई चालवली. मीरारोड विभागाने ४१ तर भार्इंदर विभागाने ३८ गुन्हे दाखल केले आहेत. मीरारोड मधील नया नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक केलास बर्वे यांनी सर्वाधिक २६ गुन्हे दाखल केले आहेत. भार्इंदरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव, मीरारोडचे निरीक्षक संदिप कदम, काशिमीराचे वरिष्ठ निरीक्षक संंजय हजारे, नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रकाश बिराजदार, उत्तन सागरी पोलीस ठाणे प्रभारी सतिश निकम आदींनी देखील गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही चालवली आहे.
दाखल गुन्ह्यां मध्ये विविध दुकान चालकांसह स्रेहांजली सारख्या बड्या शोरुमचा सुध्दा समावेश आहे. शिवाय अंतपुरा बारचा चालक विश्वनाथ शेट्टी (४९) रा. भारती पार्क, मीरारोड , मनी पॅलेस बार चा चालक मंजुनाथ गौडा, स्पेंटा हॉटेलचा मुस्तफा अब्दुलवाहिद मुखी, साईदिपा बार चा प्रविण पुजारी आदींचा आरोपीं मध्ये समावेश आहे. शासन व महापालिकेने बंद करण्यास सांगीतलेल्या आस्थापना, दुकाने वा व्यवसाय सुरु ठेवणारायांवर तसेच गर्दी गोळा करणारायांवर देखील गुन्हे दाखल करत आहोत. कोरोनाचा संसर्ग ही राष्ट्रीय आपत्ती असल्याने सर्वांनी यात सहकार्य करावे. पण जे उल्लंघन करतील त्यांची गय केली जाणार नाही असा इशारा अपर पोलीस अधीक्षक संजयकुमार पाटील यांनी दिला आहे.