मुंब्रा आणि शीळ येथील गावठी दारुच्या अड्डयांवर गुन्हे शाखेची धडक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 10:32 PM2019-03-12T22:32:35+5:302019-03-12T22:38:26+5:30
मोठी देसाई गावाच्या खाडी किनारी भागातील गावठी दारु निर्मिती अड्डयांवर ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या दोन वेगवेगळया पथकांनी मंगळवारी एकाच वेळी धाडसत्र राबविले. आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पोलिसांच्या मदतीने ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने ही कारवाई केली.
ठाणे: लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मोठी देसाई गावाच्या खाडी किनारी भागातील गावठी दारु निर्मिती अड्डयांवरठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या दोन वेगवेगळया पथकांनी मंगळवारी एकाच वेळी धाडसत्र राबविले. या कारवाईमध्ये सहा लाख १५ हजार ६२० रुपयांचे १२ हजार लीटर दारु निर्मितीचे रसायन नष्ट केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मुंब्रा आणि शीळ डायघर पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रातील मोठी देसाई गावाच्या बाजूला असलेल्या जंगलामध्ये खाडी किनारी हातभट्टी लावून दारु गाळण्याचे काम चालते, अशी माहिती गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक अविराज कु-हाडे आणि उपनिरीक्षक कैलास सोनावणे यांच्या अधिपत्याखालील दोप वेगवेगळया पथकांनी १२ मार्च रोजी सकाळी या भागात धाडसत्र राबविले. कु-हाडे यांनी शीळ डायघर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक दत्तात्रय सरक, अशोक माने, सागर शिंदे, हवालदार अबुतालीब शेख आणि सुभाष मोरे तसेच उपनिरीक्षक कैलास सोनावणे यांनी मुंब्रा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप सरफरे आदींच्या पथकासह देसाई गावाच्या दुर्गम जंगलामध्ये खाडीकिनारी ही कारवाई केली. त्याठिकाणी गावठी हातभट्टीची दारु गाळण्याचे काम सुरु होते. पोलीस पथकाची चाहूल लागताच अतुल केले, दिपक केणे, किरण केणे, राहूल केणे, रुपेश म्हात्रे, सचिन पाटील आणि प्रशांत रोकडे आदी दारुची निर्मिती करणाऱ्या टोळीने तिथून खाडीचा फायदा घेऊन जंगलात पलायन केले. शीळ डायघर भागातून गावठी दारु निर्मितीसाठीचे दोन लाख ६५ हजार १२० रुपये किंमतीचे रसायन तर मुंब्रा भागातून तीन लाख ५० हजार ५०० रुपये असा सहा लाख १५ हजार ६२० रुपयांचा दारु निर्मितीचा कच्चा माल आणि सामुग्री जागीच नष्ट करण्यात आली. या दोन्ही प्रकरणामध्ये शीळ डायघर आणि मुंब्रा या दोन पोलीस ठाण्यांमध्ये दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. फरारी आरोपींचाही शोध घेण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.