नौपाड्यात क्षुल्लक कारणावरून दोघांमध्ये जोरदार हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 12:13 AM2019-09-16T00:13:59+5:302019-09-16T00:14:03+5:30
किरकोळ कारणावरून नौपाड्यातील विष्णूनगर भागातील दोन कुटुंबांमध्ये वाद उफाळून आल्याने दोघांनी एकमेकांना मारहाण केली.
ठाणे : किरकोळ कारणावरून नौपाड्यातील विष्णूनगर भागातील दोन कुटुंबांमध्ये वाद उफाळून आल्याने दोघांनी एकमेकांना मारहाण केली. याप्रकरणी राहुल पैठणकर आणि हसमुख शहा यांंनी एकमेकांविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात नुकत्याच तक्रारी दाखल केल्या आहेत. या हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने तो ठाण्यात चर्चेचा विषय ठरला असून त्यात मराठीविरुद्ध गुजराती असा रंग दिल्याने चीड व्यक्त होत आहे.
सुयश सोसायटीतील पैठणकर यांना याच इमारतीत राहणाऱ्या हसमुख यांनी बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना ११ सप्टेंबरला घडली. लिफ्टचा दरवाजा चुकून अर्धवट उघडा राहिल्याने पैठणकर आणि त्यांच्या घरातील सदस्यांना शहा पिता-पुत्राने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. याप्रकरणी पैठणकर यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल केली आहे. त्याचवेळी शहा यांनीही पैठणकर यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. त्यावरून अदखलपात्र गुन्हे दाखल केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांनी सांगितले. दरम्यान, या मारहाणीमुळे पैठणकर आणि त्यांचे कुटुंब भीतीच्या सावटाखाली आहे. इमारतीच्या पाचव्या मजल्यावर पैठणकर तर सहाव्या मजल्यावर शहा कुटुंब राहते. ११ सप्टेंबरला लिफ्ट येण्यास उशीर झाल्याने दोघांमध्ये शाब्दिक वाद होऊन प्रकरण हाणामारीवर गेल्याचे सूत्रांनी सांगितले.
>राहुल यांच्या आईची चप्पल लिफ्टमध्ये अडकल्यामुळे लिफ्टचा दरवाजा चुकून अर्धवट उघडा राहिला. याचाच जाब विचारण्यासाठी गेलेल्या शहा यांनी पैठणकरांना मारहाण केली. त्याआधी पैठणकरांनीही शहा यांच्या नाकावर मारहाण केल्याचा आरोप आहे. या दोघांचा वाद एका व्हिडीओमधून सोशल मीडियाद्वारे व्हायरल केला जात आहे. यात नाहक कोणीही कोणाची बदनामी करीत असेल, तर संबंधितांविरुद्धही माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली गुन्हा दाखल केला जाईल.
- अनिल मांगले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक,
नौपाडा पोलीस ठाणे