पावसाळ्यातील साथरोगांचा सामना करण्यासाठी ठामपा सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:45 AM2021-05-25T04:45:15+5:302021-05-25T04:45:15+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : कोरोनाचे सावट असताना दुसरीकडे काही दिवसांवर पावसाळा येऊन ठेपला आहे. पावसाळ्यात उद‌्भवणाऱ्या साथरोगांचा ...

Strongly prepared to deal with rainy season infectious diseases | पावसाळ्यातील साथरोगांचा सामना करण्यासाठी ठामपा सज्ज

पावसाळ्यातील साथरोगांचा सामना करण्यासाठी ठामपा सज्ज

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : कोरोनाचे सावट असताना दुसरीकडे काही दिवसांवर पावसाळा येऊन ठेपला आहे. पावसाळ्यात उद‌्भवणाऱ्या साथरोगांचा सामना करण्यासाठी ठाणे महापालिकेची आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. पावसाळ्यात नागरिकांनीही काळजी घ्यावी, असे आवाहन मनपाने केले आहे.

पावसाळ्यात ताप आल्यास तत्काळ नजीकच्या मनपा रुग्णालयात, आरोग्य केंद्रांत जाऊन रक्त तपासणी करावी. स्वत:च्या घरातील अथवा आजूबाजूची व्यक्ती हिवताप, डेंग्यू ताप, कावीळ, हगवण, विषमज्वर (टायफाइड), लेप्टोस्पायरोसिस आदी साथीच्या रोगांनी आजारी झाल्याचे निदर्शनास आल्यास त्याची माहिती तत्काळ नजीकच्या मनपा दवाखान्यात अथवा आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यालयात देऊन वेळीच उपाययोजना करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन मनपाने केले आहे.

सात दिवसांपेक्षा जास्त दिवस साठविलेल्या अथवा साचलेल्या स्वच्छ पाण्यात, धुणी भांडी करण्यासाठी वापरण्यात येणारे पाण्याचे उघडे ड्रम, घराच्या आसपास पडलेल्या नारळाच्या करवंट्या, बांधकामासाठी वापरण्यात येणारे पाण्याचे हौद, हवाबंद झाकण नसलेल्या घरातील पाणी साठवण टाक्या आदींमध्ये पाणी साचून डासांची निर्मिती होऊन त्यापासून मलेरिया होण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी पाणी गाळून व उकळून प्यावे. ते शुद्ध करण्यासाठी क्लोरीन वापरावे. इमारतींमधील व घरातील पाण्याच्या टाक्या साफ कराव्यात. शिळे, उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नयेत. साचलेल्या पाण्यात चालणे टाळावे. सात दिवसांपर्यंत पाणी साठवू नये, साठविलेल्या पाण्याच्या ड्रमवर घट्ट झाकण बसवावे, सोसायटीच्या आवारात, टेरेसवर अथवा घराभोवती नारळाच्या करवंट्या, वाहनांचे टायर, रिकामे डबे असल्यास त्याची योग्य ती विल्हेवाट लावावी, सेप्टिक टँक त्वरित दुरुस्त करून घ्यावेत आणि सोसायटीचा परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहनही मनपाने केले आहे.

पावसाळ्यात दुकानदारांनी दुकानाबाहेर उघड्यावर ठेवलेल्या निकाम्या टायरमध्ये किंवा पाण्याच्या पिंपांमध्ये पावसाचे पाणी साचून त्यात डास-अळी आढळल्यास तसेच यामुळे आजूबाजूच्या परिसरात, चिकुन गुन्या तसेच डेंग्यू तापाचे डास आढळल्यास महापालिका अधिनियम १९४९ मधील तरतुदीनुसार संबंधित दुकानदारांवर मनपाच्या आरोग्य विभागाकडून कारवाई करण्यात येईल.

अधिकारी, कर्मचारी ठेवणार विशेष लक्ष

- पावसाळ्यातील साथरोगांचा सामना करण्यासाठी ठामपाचा आरोग्य विभाग सज्ज असून, फायलेरिया विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि प्रत्येक आरोग्य केंद्रांतील कर्मचाऱ्यांचा ताफा पावसाळ्यात विशेष लक्ष ठेवणार आहेत. याशिवाय भित्तीपत्रके प्रत्येक सोसायटीला दिली जाणार आहेत.

- याबाबत ठामपाचे उपायुक्त संदीप माळवी म्हणाले की, पावसाळ्यातील साथीच्या रोगांचा मुकाबला करण्यासाठी आम्ही सर्व तयारी केली आहे. परंतु, नागरिकांनी काळजी घेऊन सहकार्य करावे.

--------------------

Web Title: Strongly prepared to deal with rainy season infectious diseases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.