१८४ इमारतींचेच स्ट्रक्चरल आॅडिट
By admin | Published: January 22, 2016 03:27 AM2016-01-22T03:27:16+5:302016-01-22T03:27:16+5:30
महापालिकेने पावसाळ््याची पूर्वतयारी म्हणून शहरातील धोकादायक इमारतींना नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे. शहरातील ३० वर्षांपेक्षा जुन्या
ठाणे : महापालिकेने पावसाळ््याची पूर्वतयारी म्हणून शहरातील धोकादायक इमारतींना नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे. शहरातील ३० वर्षांपेक्षा जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिट करणे बंधनकारक केल्यानंतर आतापर्यंत २,२८२ पैकी केवळ १८४ इमारतींचेच स्ट्रक्चरल आॅडिट केल्याची माहिती समोर आली आहे.
मागील वर्षी आॅगस्टमध्ये नौपाड्याच्या बी केबीन भागातील कृष्ण निवास इमारत कोसळून १२ जणांचा बळी गेला होता. त्यानंतर शहरातील धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यामुळे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ३० वर्षे जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याच्या
सूचना पालिका प्रशासनाला दिल्या होत्या.
अशा इमारतींची यादीही पालिकेने जाहीर केली आणि २,२८२ इमारतींना नोटिसाही बजावल्या. त्यानंतर आतापर्यंत केवळ १८४ इमारतींनी त्यांचे स्ट्रक्चरल आॅडिट करून घेतले आहे.
जुन्या इमारतीमधील रहिवाशांची ही उदासीनता महापालिकेसाठी काळजीचा विषय ठरली आहे.
विशेष म्हणजे, या इमारतींपैकी
५८ इमारती अतिधोकादायक असल्याची माहिती पालिका
सूत्रांनी दिली, तरीही तेथील रहिवासी शांत आहेत.
शहर विकास विभागाच्या नियमानुसार, ३० वर्षांपेक्षा जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिट करून त्यांची दुरुस्ती करणे बंधनकारक आहे. आॅडिटमध्ये इमारत धोकादायक आढळली आणि ती रहिवाशांनी दुरुस्ती केली नाही, तर तो भार महापालिकेला सांभाळणे शक्य
नाही, तसेच मोठ्या प्रमाणात इमारती धोकादायक आढळल्यास आणि महापालिकेने त्यांच्यावर सरसकट कारवाई केल्यास, तेथील रहिवाशांना पर्यायी जागा देण्यासाठी महापालिकेकडे जागाही उपलब्ध नाहीत. त्यामुळे रहिवाशांनी जागरूकतेने स्ट्रक्चरल आॅडिट आणि दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचे मत महापालिका अधिकाऱ्याने व्यक्त केले. (प्र्रतिनिधी)