उल्हासनगरातील १३०० इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट; हजारो नागरिकांचे जीव टांगणीला
By सदानंद नाईक | Published: May 12, 2023 05:21 PM2023-05-12T17:21:55+5:302023-05-12T17:23:05+5:30
उल्हासनगर : शहरात ऐन पावसाळ्यात इमारत स्लॅब कोसळून होणारी दुर्घटना टाळण्यासाठी महापालिकेने १० वर्ष पेक्षा जुन्या १३०० इमारतींना नोटिसा ...
उल्हासनगर : शहरात ऐन पावसाळ्यात इमारत स्लॅब कोसळून होणारी दुर्घटना टाळण्यासाठी महापालिकेने १० वर्ष पेक्षा जुन्या १३०० इमारतींना नोटिसा देऊन, त्यांच्यात जनजागृतीसाठी शिबीर बोलाविले. टॉउन हॉल मधील शिबिरात नागरिकांनी सुरक्षेसाठी आपापल्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आयुक्त अजीज शेख यांनी सांगितले.
उल्हासनगरात दरवर्षी पावसाळ्या मध्ये धोकादायक इमारतीचे स्लॅब कोसळून जीवित व वित्तहानी होते. महापालिकेने इमारत कोसळून जीवितहानी टाळण्यासाठी शहरातील १० वर्ष जुन्या तब्बल १३०० इमारतींना नोटिसा देऊन, इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे सुचविले आहे. याबाबत नागरिकांत जनजागृती होण्यासाठी गुरवारी सायंकाळी ५ वाजता टॉउन हॉल मध्ये शिबिराचें आयोजन केले होते. शिबिराला नागरिकांसह राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी, सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, महापालिका अधिकारी, पोलीस व तहसीलदार, वास्तुविशारद, अभियंता, नाखवा अभियंता पथक आदीजन उपस्थिती होते. यावेळी आयुक्तांनी धोकादायक इमारती बाबत माहिती देऊन, नोटिसा दिलेल्या १३०० इमारती मधील नागरिकांनी स्ट्रक्चरल ऑडिट करून ऑडिट नंतर सुचविलेली इमारत दुरुस्ती करणे गरजेचे आहे.
महापालिकेने नेमून दिलेली नाखवा संस्था अथवा मान्यताप्राप्त खाजगीकडून स्ट्रक्चरल ऑडिट करणे गरजेचे असल्याचे आयुक्तांनी सांगितले. महापालिकेचे नगररचनाकार प्रकाश मुळे यांनी इमारतीच्या स्ट्रक्चरल ऑडिट बाबत माहिती देऊन, स्ट्रक्चरल ऑडिट केल्यानंतर इमारतीचा अहवाल महापालिकेकडे सादर करून ऑडिट मध्ये दिल्याप्रमाणे इमारतीची दुरुस्ती करण्याचे मुळे यांनी सुचविले. शिबिराला आमदार कुमार आयलानी, आयुक्त अज़ीज़ शेख, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, करूणा जुईकर, तहसीलदार कोमल ठाकूर, मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, महापालिका अधिकारी व कर्मचारी, माजी नगरसेवक, सामाजिक संस्था, एनडीआरएफ टीम, अग्निशमन दल, ऋषभ कर्णावत, अनिरुध्द नाखवा आदीजण शिबिराला उपस्थित होते.
ट्रान्झिट कॅम्पला ३० कोटी
पावसाळ्यात इमारत कोसळून आपत्कालीन परिस्थिती शहरात निर्माण होते. अश्यावेळी दुर्घटनाग्रस्त नागरिकांना तात्पुरता निवारा देण्यासाठी महापालिकेकडे कोणतीही यंत्रणा नाही. अश्यावेळी तात्पुरता निवाराकेंद्र असणे गरजेचे आहे. शासनाने त्यासाठी ३० कोटीचा निधी मंजूर केला असून त्या निधीतून भव्यदिव्य ट्रान्झिट कॅम्प उभा राहणार आहे. अशी माहिती आयुक्त अजीज शेख यांनी उपस्थितीत नागरिकांना दिली.