‘समतोल’ साधण्याची धडपड
By admin | Published: December 28, 2015 02:24 AM2015-12-28T02:24:32+5:302015-12-28T02:24:32+5:30
विजय जाधव यांचा जन्म जुन्नर तालुक्यातील एका लहानशा गावी झाला. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षणाचे धडे गरवित त्यांनी महाविद्यालय शिक्षणाची कास धरली.
विजय जाधव यांचा जन्म जुन्नर तालुक्यातील एका लहानशा गावी झाला. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षणाचे धडे गरवित त्यांनी महाविद्यालय शिक्षणाची कास धरली. शिक्षणासाठी त्यांना कॉलेज जवळ नसल्याने पायपीट करीत कॉलेज गाठावे लागत होेते. उच्च शिक्षण घेण्याची आर्थिक स्थिती घरी नसल्याने त्यांनी पुण्यातील ‘आयटीआय’ केले. येथे पॉवर प्रेस मशीन या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. या अभ्यासक्रमांसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क भरायला लागणार नसल्याने त्यांची निवड केली. इयत्ता चौथीच्या वर्गात त्यांना स्कॉरलशीप मिळाली होती. पुढील शिक्षणासाठीही स्कॉलरशीप मिळविण्यासाठी त्यांची धडपड होती. पुढे त्यांचा नर्मदा बचाव आंदोलनाशी संपर्क आला. त्यानंतर रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत काही काळ काम केल्यावर एक सामाजिक दृष्टीकोन तयार होत गेला. मनोभूमी तयार होत होती.
२००४ सालीच घरातून पळ काढून निराधार जीवन जगणाऱ्या पाच ते १५ वयोगटातील विद्यार्थ्यांच्या कामाला सुरुवात केली. त्यांचे मन परिवर्तन करायला सुरुवात केली. संस्थेचे नाव गाव ठरलेले नव्हते. काम सुरू झाले होेते. प्रत्यक्षात समतोलची नोंदणी २००६ साली झाली. घरातून पळून आलेली मुले ही बहुतांश रेल्वे स्टेशन परिसरात आणि रेल्वे फलाटावर आश्रय घेतात. रेल्वे स्थानक हे त्यांचे वास्तव्याचे ठिकाण असल्याचे संस्थेच्या आतापर्यंतच्या कामकाजातून दिसून आले आहे. ही मुले अनाथ नसतात. ती विविध कारणास्तव घरातून पळ काढतात. त्यांचे मत परिवर्तन केल्यास ती पुन्हा त्यांच्या पालकांकडे जाऊ शकतात. हा विश्वास आहे. तो आमच्या कार्यातून सिद्ध झाला आहे, असे जाधव सांगतात. आंतरराज्यीय तसेच परप्रांतातून आलेल्या मुलांनी त्यांच्या घरी परत जाऊन त्यांच्या भाषेतून त्यांचा विकास साधावा, हा संस्थेचा हेतू आहे. घरातून पळून आलेली फसविली गेलेली मुले बालकामगार म्हणून राबवून घेतली जातात. काही वेळेस त्यांच्याकडून भीक मागण्याचे काम करून घेतले जाते. आमची संस्था ही मुले प्रथम शोधून काढते. त्यासाठी सरकारी यंत्रणांचे सहकार्य घेऊन हे काम केले जाते.
आणि पालक संस्थेचे
कार्यकर्ते होतात..
समतोलच्या आतापर्यंतच्या कामातून जवळपास १२ हजार मुलांना त्यांच्या घरी पाठविण्यात आलेले आहे. इंडियन ब्युरोने दिलेल्या माहितीनुसार दर सेकंदाला एक मुलाचे अपहरण होते. देशभरात वर्षातून १२ लाख मुले घर सोडून बेपत्ता होतात. निराधार होतात. त्यांचे आयुष्य भरकटते. आमची संस्थेच्या कामकाजातून महिन्याला ८० मुले सापडतात. त्याचे मत परिवर्तन करुन त्यांना त्यांच्या आई वडिलांकडेअथवा नातेवाईकांकडे सोडले जाते. ज्या मुलांना आम्ही त्यांच्या पालकांकडे परत सोडतो. त्यांचे पालक संस्थेचे कार्यकर्ते होतात. आता संस्थेत २५ सामाजिक कार्यकर्ते काम करीत आहेत. त्यांनी संस्थेला पूर्णवेळ दिला आहे.
‘बचपन बचाव’ फक्त
घोषणा राहू नये...
पूर्वी मुले घरातून पळून गेल्यावर मिसिंगची नोंद पोलिस ठाण्यात केली जात होती. वर्षभरापासून अल्पवयीन मुलांच्या मिसिंग प्रकरणी मिसिंगचा गुन्हा दाखल न करता अपहरणाचा गुन्हा दाखल केला जात आहे. ही एक चांगली बाब आहे. घरातून पळून गेलेल्या मुलांसाठी रेल्वे स्थानकावरच शाळा असावी. या संकल्पनेवर नागपूर महापालिका व नागपूर रेल्वे प्रशासन यांनी नागपूर येथे निवासी शाळा सुरू केली आहे. यामध्ये शंभर मुले शिक्षण घेत आहेत. ही शाळा विश्व हिंदू परिषदेकडून चालविली जाते. त्याच धर्तीवर प्रत्येक जिल्ह्यात व राज्यात अशी शाळा तयार व्हावी. त्याचा सरकारने विचार करावा. ‘बचपन बचाव’ ही केवळ घोषणा न राहता, ती प्रत्यक्षात यावी. कल्याण मुरबाड रोडवर मामणोलीला आमच्या संस्थेकडून घरातून पळून आलेल्या मुलांची काळजी घेतली जाते.
समाज बालप्रेमी व्हावा
निराधार व पळून आलेल्या मुलांविषयी समाजाचा नकारात्मक दृष्टीकोन आहे. तो बदलण्याची गरज आहे. समाज बालप्रेमी होण्याची गरज आहे. केवळ आपल्या पोटच्या मुलावर प्रेम न करता. समाजातील निराधार मुलांवरही प्रेम करण्याचा विचार, त्यांच्यासाठी मदतीचा विचार केला तर खऱ्या अर्थाने बचपन बचावचे हित साध्य होईल. पलायन केलेल्या मुलांना सुरक्षितता हवी असते. ती त्यांना देण्याची गरज आहे. मुले घरातून पळ काढतात, ही सामाजिक तशीच कौटुंबिक समस्या आहे.
समता, ममता, तोहफा आणि लक्ष्य..
कुटुंंब व्यवस्था सक्षम व्हावी यासाठी समतोल काम करते. समतोलचा तो गाभा आहे. समतोल याचा अर्थ स-समता, म-ममता, तो- तोहफा आणि ल-लक्ष्य असा आहे. संस्थेचा वार्षिक खर्च सुमारे पन्नास लाख रूपये इतका आहे. या कामासाठी आजपर्यंत कोणतेही शासकीय अनुदान किंवा परकीय संस्थेक डून आर्थिक मदत घेतलेली नाही. समाजातील दानशूर संस्था आणि व्यक्तींकडून मिळणाऱ्या आर्थिक आणि अन्य वस्तू स्वरूपाच्या मदतीवर संस्थेचे कामकाज सुरू आहे.
गावकऱ्यांनी काढली मिरवणूक ..
एका गावात एका मुलाला आम्ही सोडण्यासाठी गेलो तेव्हा त्या गावातील मंडळीना इतका आनंद झाला की, माझ्यासह माझ्या मित्रांची गावकऱ्यांनी मिरवणूक काढली. या मिरवणुकीतून आम्हाला पुढील कार्यासाठी प्रेरणाच मिळाली. ती एक प्रकारची खरी शाबासकी होती. आमच्या कार्याला ही मिळालेली पोचपावती होती. संस्थेला आजवर विविध संस्था आणि संघटनांकडून चाळीस पुरस्कार तसेच चेन्नई शासनाचाही पुरस्कार मिळाला आहे.
आनंदाश्रू हे आमची प्रेरणा
घरातून पळून गेलेला मुलगा परत मिळतो. तेव्हा त्याच्या आईच्या डोळ््यातील आनंदाश्रू हे आमची प्रेरणा आहे. आम्ही आईला आनंद देतो. तिच्या लेकराची भेट घालून देतो. त्यासारखे कामाचे कोणतीही मोठे समाधान व कार्याचा आनंद नाही. कोणत्याही पुरस्कारपेक्षा आईंचे डोळ््यातील अश्रु व आनंद मोठा वाटत असल्याचे मला मनापासून वाटते.