ठाण्यात रस्त्यांच्या दुरवस्थेविरोधात होतोय सोशल मीडियावर टाहो; वाहतूककोंडीने झाले त्रस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2019 12:15 AM2019-11-01T00:15:54+5:302019-11-01T06:27:51+5:30
पावसाळा संपला तरी अंतर्गत रस्त्यांची चाळण
ठाणे : घोडबंदर भागात मेट्रो चारचे काम सुरू असल्याने वाहतूककोंडी होत आहे. परंतु, या भागातील अंतर्गत रस्त्यांची चाळण अद्यापही कायम असल्याने येथील रहिवाशांनी या रस्त्यांची कामे व्हावीत म्हणून फेसबुकसह इतर सोशल मीडियाचा आधार घेऊन लढा उभा केला आहे. आमच्या मागणीकडे कोणी लक्ष देणार आहे का?, या भागातील किमान अंतर्गत रस्ते तरी योग्य प्रकारे करावेत, अशी मागणी या माध्यमातून केली आहे.
सध्या घोडबंदर भागात वडाळा ते कासारवडवली या मेट्रो चारचे काम वेगाने सुरू आहे. परंतु, यामुळे मुख्य रस्त्यांवर सकाळ, सायंकाळच्या सुमारास वाहतूककोंडी होत आहे. त्यावर अद्यापही योग्य तो तोडगा काढण्यात पालिका किंवा इतर यंत्रणांना यश आलेले नाही. दुसरीकडे मुख्य रस्त्यांसहघोडबंदर भागातील अंतर्गत रस्त्यांचीही वाताहत झाली आहे. घोडबंदर पट्ट्यातील अनेक सोसायटींनी यासंदर्भात पालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयन्त केला असून ब्रह्मांड, वाघबीळ ,कावेसर, पातलीपाडा, आनंदनगर, कासारवडवली या भागातील रस्ते अतिशय खराब असून त्यांवर अजूनही मोठ्याप्रमाणात खड्डे आहेत. सेवा रस्त्यांचीही अवस्था जैसे थे अशीच आहे.
घोडबंदरच्या मुख्य हायवेला मेट्रोचे काम सुरू असल्याने या ठिकाणी बॅरिकेडस टाकल्याने रस्ते अरुंद झाले आहेत. त्यामुळे वाहतूकोंडीपासून वाचण्यासाठी वाहनचालकांकडून या पर्यायी रस्त्यांचा वापर केला जातो. मात्र,तेदेखील खराब असल्याने कोणत्या रस्त्यांचा वापर करावा असा प्रश्न वाहनचालकांना पडला आहे. दुसरीकडे कावेसर भागातील अतिशय खराब झालेला रस्ता लवकर दुरु स्त करावा अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पालिका प्रशासनाला एक पत्र दिले असून दिवाळीच्या सुटींनंतर शाळा पुन्हा सुरू होण्याच्या पूर्वी निदान तो दुरुस्त करावा अशी मागणी या पत्रात पालिका प्रशासनाकडे केली आहे.
घोडबंदर सोसायटीचे पदाधिकारी असलेले वामन काळे यांच्या म्हणण्यानुसार, घोडबंदरचा मुख्य हायवेवर वाहतूककोंडी असल्याने बहुतांश वाहनचालक हे ब्रह्मांड, वाघबीळ, कावेसर, पातलीपाडा, आनंदनगर, कासारवडवली या अंतर्गत रस्त्यांचा वापर करतात. विशेष करून ट्रफिक पार्कच्या येथून जाणाऱ्या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय आहे. त्यामुळे तो दुरु स्त करावा अशी मागणी काळे यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे. तसेच त्या आशयाचे पत्रही त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केले आहे. या रस्त्यावर आधी मलवाहिन्या टाकण्याचे काम करण्यात आले असून त्यामुळेदेखीलतो खराब झाला असल्याचे काळे यांचे म्हणणे आहे. या परिसरात प्लश, उन्नती वूड्स ट्रॉपिकल लगून, रेंजन्सी टॉवर्स, स्वस्तिक रेसिडेन्सी अशी अनेक मोठी गृहसंकुले असून शाळादेखील आहेत. हे सर्व जण या रस्त्याचा वापर करत असल्याने किमान अंतर्गत रस्ते तरी योग्य पद्धतीने आणि वेळेत दुरुस्त व्हावेत अशी मागणी केली आहे.
या सर्व सेवा रस्त्यांचे मजबुतीकरण करण्याच्या निर्णय घेण्यात आला असून स्पेशल ट्रिटमेंट देऊन सेवा रस्त्यांची दुरु स्ती करण्याचे आदेश पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत. या आठवड्यात बजेटचीदेखील तरतूद करण्यात येणार आहे. तर ट्रफिक पार्क येथील कावेसरच्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम एकदा केले होते. मात्र, पाऊस पडल्याने पुन्हा हा रस्ता खराब झाला असून खडीदेखील बाहेर आली आहे. या परिसरात सर्वच ठिकाणी रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले असून या रस्त्याच्या दुरु स्तीच्या कामालादेखील येत्या ८ दिवसांमध्ये सुरु वात करणार आहोत. - रवींद्र खडताळे, नगर अभियंता ठाणे महापालिका